Konkan Shimga Utsav 2021: होळी निमित्त मुंबई मधून रत्नागिरी जिल्ह्यासाठी विशेष बसेसची सोय; 26 मार्चपासून दररोज 40 एसटी धावणार
ST Bus (Image used for representational purpose only) (Photo credits: PTI)

कोकणवासियांसाठी असणारा खास सण म्हणजे होळी (Holi). होळी निमित्त मुंबईतून अनेक चाकरमानी कोकणात जातात. हीच बाब लक्षात घेत शिमगोत्सवानिमित्त रत्नागिरीत जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खास बसेसची सोय करण्यात आली आहे. 26 मार्चपासून दररोज 40 बस मुंबईतून (Mumbai) रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यात सोडण्यात येणार आहेत. त्याचबरोबर परतीच्या प्रवासासाठी देखील बसेसची सोय करण्यात आली आहे. बसेसमध्ये कोरोनाच्या नियंमाचे पालन होणार असल्याची माहिती रत्नागिरी विभाग नियंत्रकांकडून देण्यात आली आहे.

शिमगोत्सवानिमित्त कोकणात जाण्याचा उत्साह असला तरी कोविड-19 संकटाच्या पार्श्वभूमीवर गावात जाणाऱ्या प्रत्येकाची कोरोना चाचणी निगेटीव्ह असणे, बंधनकारक असणार आहे. तसंच इतरही नियम लागू केले आहेत. विशेष म्हणजे मुंबईकरांनी होळीनिमित्त कोकणात येऊ नये, असे आवाहनही करण्यात आले आहे. (शिमगा उत्सवासाठी रत्नागिरी जिल्ह्यात नियमावली जारी; जाणून घ्या काय आहेत नियम)

होळी आणि गणपती हे कोकणवासियांसाठी अत्यंत महत्त्वाचे सण. मात्र मागील वर्षी कोरोना व्हायरसच्या संकटामुळे शिमगोत्सवानिमित्त चाकरमान्यांना कोकणात जाण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर गणेशोत्वावरही कोरोनाचे सावट असल्याने अनेकांना गावी जाता आले नव्हते. यंदाही कोविड-19 चे संकट कायम असल्याने शिमगोत्सवावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे चाकरमान्यांच्या उत्साहावर पाणी फिरले आहे. (वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची नवी नियमावली; पहा 31 मार्च पर्यंत कोणत्या गोष्टींवर निर्बंध)

दरम्यान, सध्या कोविड-19 चा प्रादुर्भाव पुन्हा मोठ्या प्रमाणावर वाढू लागला आहे. त्यामुळे धोका टाळण्यासाठी प्रशासनाकडून नियमावली जारी करण्यात आली आहे. या नियमांचे पालन करणे आपल्या कुटुंबियांसह इतरांच्याही हिताचे ठरेल.