Maharashtra COVID 19 Fresh Guidelines: वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची नवी नियमावली; पहा  31 मार्च पर्यंत कोणत्या गोष्टींवर निर्बंध
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-File Image)

महाराष्ट्रात सध्या मागील सहा महिन्यांमधील उच्चांकी कोरोनाबाधितांच्या संख्या नोंदवली गेली असल्याने प्रशासन पुन्हा अलर्ट मोड वर गेले आहे. आज राज्य सरकार कडून कोरोना स्थिती नियंत्रणामध्ये आणण्यासाठी नवी नियमावली जारी केली आहे. यामध्ये आता राज्यातील खाजगी कार्यालय (Private Offices, सभागृह(Auditoriums), नाट्यगृहं (Drama Theatres) 50% क्षमतेने चालवण्याचे आदेश दिले आहेत. राज्य सरकारची ही नवी नियमावली 31 मार्च पर्यंत सध्या लागू असेल असे सांगण्यात आले आहे. राज्यात धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक मेळावे आणि इतर सभा अशा कोणत्याही कारणांसाठी आता गर्दी करता येणार नाही असे सरकारकडून सांगण्यात आले आहे. खजागी कार्यालयांमध्ये आरोग्य व इतर अत्यावश्यक सेवा, आस्थापना तसेच मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र वगळून इतर  कार्यालयांसाठी 50% क्षमतेची निर्बंध आहेत. सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना मास्क योग्यरित्या वापरणंदेखील बंधनकारक करण्यात आले आहे.  Mumbai: 22 मार्चपासून मॉल्सला भेट देण्यासाठी कोविड - 19 नकारात्मक अहवाल अनिवार्य - BMC.

महाराष्ट्र राज्यात काल दिवसभरात 25,833 नवे रुग्ण आढळून आले आहेत. 2021 मधील हा सर्वात मोठा आकडा आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनास्थिती आता पुन्हा चिंताजनक होत आहे. दरम्यान काल दिवसभरात 12764 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 58 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या 1 लाख 66 हजार 353 रुग्णावर उपचार सुरु आहेत. महाराष्ट्रात सध्या देशातील सर्वाधिक अ‍ॅक्टीव्ह रूग्ण आहेत.

दरम्यान आज मुंबई महानगर पालिकेनेही शहरातिल महत्त्वाच्या आणि मोठ्या मॉलमध्ये प्रवेशापूर्वी त्यांचा कोविड19 रिपोर्ट निगेटीव्ह असल्याचं दाखला सादर करणं बंधनकारक केले आहे. आता मॉलच्या प्रवेशद्वारावर देखील अ‍ॅन्टिजन टेस्ट केल्या जाणार आहेत तो रिपोर्ट निगेटीव्ह आल्यास नागरिकांना मॉलमध्ये प्रवेश मिळेल. तसेच महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवरही नागरिकांची तपासणी होणाार आहे. राज्य सरकारने यापूर्वीच लग्न कार्यक्रमांमध्ये 50 लोकांची आणि अंत्यविधी साठी 20 लोकांची मर्यादा लागू केली आहे.

राज्यातील 134 खासगी रुग्णालयांना लसीकरणासाठी केंद्राची मान्यता मिळाली असून रोज 3 लाख लसी दिल्या गेल्या पाहिजेत यादृष्टीने नियोजन करण्याचेही आदेश काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत.