Silver Bar | PC: Pixabay.com

कर्जत (Kajat) मध्ये एका मटण विक्रेत्याने चक्क ग्राहकांना त्यांच्या यशातील वाटेकरी म्हणून चांदीची बिस्किटं विकल्याचा एक प्रकार समोर आला आहे. दुकानाच्या वर्धापन दिनी 'लकी ड्रॉ' च्या माध्यमातून 63 जणांना विविध आकारामधील बिस्किटं दिली आहे. शरद तनपुरे (Sharad Tanpure) असं या मटण विक्रेत्याचं नाव असून त्यांच्या उपक्रमाची सध्या सर्वत्रच चर्चा सुरू आहे.

मटण आणि मासे याच्या व्यवसायात असलेल्या तनपुरे यांनी कमी वेळात आपल्या व्यवसायाचा पसारा वाढवला. कर्जतमधून सुरू झालेला त्यांचा व्यवसाय आता राज्यांत 17 शाखांमध्ये पोहचला आहे. त्यांनी 11 मोठी चांदीची तर 51 लहान आकारातील चांदीची बिस्किटं वाटली आहेत. कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी काही मान्यवरांनी देखील हजेरी लावली होती. हे देखील वाचा: अबब ! दिवाळी बोनस म्हणून गाड्या, एफडी, दागिने आणि घरांची खैरात .

शरद तनपुरे यांच्या राज्यातील सतराही शाखांमध्ये देशात काम करणार्‍या लष्करी जवान आणि त्यांचे कुटुंबीय, दिव्यांग व्यक्ती यांना 10% सवलत दिली जाते. शरद तनपुरेने व्यवसायाची परंपरागत चालत असलेली विक्रीची पद्धत  पूर्णपणे बदलली. अत्याधुनिक दालन, स्वच्छता, टापटीप आणि ग्राहकांना सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे अल्पावधीतच व्यवसायाने जोर पकडला. शरद तनपुरेने  नोकरीच्या मागे न लागता स्वत:च्या पायावर उभा राहत एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.  त्याचा प्रवास अनेकांना प्रेरणादायी असणार आहे.