मुंबई लोकल रेल्वे (Mumbai Local) प्रवास म्हणजे मुंबई शहर, उपनगर आणि मुंबईलगतच्या जिल्ह्यांमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी अवघड जागचं दुखणं होऊन बसले आहे. दाखवताही येत नाही आणि सांगताही येत नाही. असून अडचण नसून खोळंबा. आज पुन्हा एकदा मुंबई मध्य रेल्वे (Central Railway Mumbai)मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. बदलापूर रेल्वे स्टेशनवर मालगाडीला चुकीचा सिंग्नल मिळाल्याने ही गाडी रेल्वे स्थानकाजवळच थांबली आहे. ती बाजूला घेण्याचे काम सुरु आहे. मात्र, त्याला वेळ लागत असल्याने कर्जत (Karjat), बदलापूर (Badlapur) दोन्ही मार्ग बंद वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. परिणामी मध्य रेल्वे मार्गावरील सर्वच स्थानकांच्या फलाटांवर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. प्रामुख्याने दादर स्टेशनवर अधिक गर्दी आहे.
प्रवाशांचा खोळंबा
मध्य रेल्वे मार्ग हा मुंबई सीएसएमटी ते खाली कर्जत, कसाऱ्यापर्यंत जातो. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातून मुंबईमध्ये नोकरी, व्यवसाय आणि इतर कामांसाठी येणाऱ्या प्रवाशांची संख्या लाखोंच्या घरात आहे. हे प्रवासी दैनंदिन याच मार्गावरुन प्रवास करतात. त्यामुळे पहाटे सुरु झालेल्या पहिल्या लोकलपासून शेवटच्या लोकलपर्यंत रेल्वेने प्रवास केला जातो. दुपारी साधारण 12 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंतचा काही अवधी सोडला तर उर्वरीत वेळेत रेल्वेला मोठी गर्दी असते. ही गर्दी सकाळच्या वेळी जेवढी असते तेवढीच सायंकाळीही असते. त्यामुळे गर्दीच्या वेळी जर रेल्वेचा खोळंबा झाला तर त्यात अधिकच भर पडते. परिणामी मुंबईकर नागरिकांना नसता मनस्ताप सहन करावा लागतो. (हेही वाचा, Mumbai Railway Update: मध्य रेल्वेने गेल्या सहा महिन्यात विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून 71.25 कोंटीचा दंड केला वसूल)
फलाटांवर मोठी गर्दी
मुंबईकरांसाठी रेल्वेचा खोळंबा होणे नवे नाही. अलिकडील काळात त्यात काहीशी घट झाली असली तरी खोळंबा होतच असतो. अगदी अलिकडेच म्हणजे काल मंगळवारी सीएसएमटी रेल्वे स्थानगाजवळ दोन सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाले. ज्यामुळे रेल्वे वाहतूकीस मोठा फटका बसला आणि प्रवाशांचे नाहक हाल झाले. त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज पुन्हा मध्य रेल्वे मार्गावरच बदलापूर स्टेशनवर मालगाडीला चुकीचा सिग्नल मिळाला आणि पुन्हा खोळंबा झाला. सांगितले जात आहे की, मालगाडी बदलापूरच्या होम फलाटावर गेली. परिणामी कर्जत आणि बदलापूर असे दोन्ही मार्ग एकाच वेळी बंद झाले. मालगाडी मूळ ट्रॅकवर आणण्यासाठी आणखी बराच अवधी लागणार असल्याने प्रवाशांचे हाल पुढचे आणखी काही तास कायम राहण्याची शक्यता आहे. सायंकाळची वेळ असल्याने घरी परतणाऱ्या महिला, पुरुषांची मोठी अडचण झाली आहे. फलाटावर उभे राहून प्रवासी मध्य रेल्वे प्रशासनाच शिव्यांची लाखोली वाहात आहेत.