Sharad Pawar Vs Ajit Pawar: 'राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी अजित पवार यांची नियुक्ती बेकायदेशीर'; शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगामध्ये उत्तर दाखल
Ajit Pawar, Sharad Pawar (PC - Facebook)

महाराष्ट्रातील राजकीय गोंधळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर (NCP) वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यामधील लढाई तीव्र होताना दिसत आहे. राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाने निवडणूक आयोगाकडे उत्तर दाखल केले आहे. ज्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या नेत्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अजित पवार यांची नियुक्ती ‘बेकायदेशीर’ असल्याची टीकाही शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाने शुक्रवारी निवडणूक आयोगाला दिलेल्या उत्तरात केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाच्या याचिकेवर निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्याकडून तीन आठवड्यांत उत्तर मागितले होते. आयोगाने दिलेली मुदत 9 सप्टेंबर रोजी संपत आहे. मात्र याच्या एक दिवस आधी शरद पवार गटाने निवडणूक आयोगाला ई-मेलद्वारे उत्तर पाठवले आहे. जी-20 बैठकीमुळे राजधानी दिल्लीतील सर्व कार्यालयांमध्ये सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आज निवडणूक आयोगाचे कार्यालयही बंद ठेवण्यात आले आहे. मात्र तरीही शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाला मेलद्वारे उत्तर पाठवण्यात आले आहे.

अजित पवार गटाने हा राष्ट्रवादीचा पक्ष असून अजित पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष असल्याचा दावा केला आहे. यासंदर्भात अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगाकडे कागदपत्रेही सादर करण्यात आली आहेत. मात्र, शरद पवार गटाने आज पाठवलेल्या उत्तरात ते सर्व दावे फेटाळून लावले आहेत. शरद पवार गटाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील राष्ट्रवादीच्या 40 आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली आहे. (हेही वाचा: Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस निवडणूक शपथपत्र प्रकरणात दोषमुक्त, कारण घ्या जाणून)

महाराष्ट्रात सत्ता आल्यानंतर अजित पवार यांनी निवडणूक आयोगात याचिका दाखल केली होती. ते राष्ट्रवादीचे प्रमुख असल्याचे त्यांनी याचिकेत म्हटले होते. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी अजित पवार यांना पक्षाच्या नियमानुसार राष्ट्रवादीचे अध्यक्ष बनवल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. हे सिद्ध करण्यासाठी अजित पवार गटाने निवडणूक आयोगाला कागदपत्रेही दिली होती. या याचिकेवर निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्याकडून उत्तर मागवले होते.