Sharad Pawar | (Photo Credits: ANI)

Sharad Pawar Press Conference: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासोबत झालेल्या बैठकीत महाराष्ट्रात केंद्रीय तपास यंत्रणांमार्फत होत असलेल्या कारवायांबाबत कोणत्याही प्रकारे चर्चा झाली नाही. मात्र, त्यांच्यासोबत महाराष्ट्रातील राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या प्रलंबीत मुद्द्यांवर चर्चा झाली. याशिवाय शिवसेना (Shiv Sena) राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर झालेल्या कारवाईबाबतही चर्चा झाल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar ) यांनी सांगीतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर शरद यांनी राजधानी दिल्ली येथील सहा जनपथ या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. या वेळी ते बोलत होते. या वेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावर कारवाई करण्याची गरजच काय होती? असा सवालही उपस्थित केला.

अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यावर झालेल्या काराईबाबत कोणत्याही प्रकारची चर्चा पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत झाली नाही, असे सांगतानाच राज्यपाल नियुक्त आमदारांच्या प्रलंबीत प्रश्नांवर विचार करुन निर्णय घेऊ असे पंतप्रधान म्हणाल्याचे पवार यांनी सांगितले. संजय राऊत यांच्यावर केलेल्या कारवाईचा मुद्दा पंतप्रधानांच्या कानावर टाकला असता त्यांची प्रतिक्रिया काय होती, असा सवाल प्रसारमाध्यमांनी विचारला. यावर त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यांची प्रतिक्रिया येईल हे अपेक्षीतही नव्हते. मात्र, आपण त्यांच्या निदर्शनास आणून दिले की, ते एक राज्यसभा खासदार आहेत आणि एका वृत्तपत्राचे संपादक आहेत. त्यांच्यावर केलेली कारवाई केवळ ते तुमच्या विरोधात बोलतात म्हणून केली आहे का? असे आपण पंतप्रधानांना म्हटल्याचेही शरद पवार यांनी सांगितले.

ट्विट

दरम्यान, पंतप्रधानांच्या भेटीनंतर महाराष्ट्रातील एका नेत्याने (सुधीर मुनगंटीवार) राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आमची कटूता नसल्याचे म्हटले होते. याबाबत विचारले असता, 'राष्ट्रवादी भाजपसोबत कधीच नव्हती. पुढेही नसेल. सध्या भाजपविरोधात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच लढत आहेत', असे पवार यांनी ठासून सांगितले. (हेही वाचा, Sharad Pawar And Pm Narendra Modi Meet: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांची दिल्लीत भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधान)

केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायावरुन महाराष्ट्रातील सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात तीव्र संघर्ष आहे. प्रामुख्याने भाजप आणि केंद्र सरकार विरोधात महाविकासआघाडी असा थेट संघर्ष आहे. असे असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदीआणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात राजधानी दिल्ली येथे भेट झाली आहे. या भेटीमुळे राजधानी दिल्लीसह थेट महाराष्ट्राच्या राजकारणातही (Maharashtra Politics) मोठ्या प्रमाणावर चर्चा आणि तर्कवितर्क सुरु झाले आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या भेटीचा तपशील अद्याप तरी सार्वजनिक झाला नाही. त्यामुळे उत्सुकता अधिकच वाढली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये साधारण 20 ते 25 मिनीटे चर्चा झाली. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेबाबत उत्सुकता होती.