Sharad Pawar and PM Narendra Modi | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायावरुन महाराष्ट्रातील सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात तीव्र संघर्ष आहे. प्रामुख्याने भाजप आणि केंद्र सरकार विरोधात महाविकासआघाडी असा थेट संघर्ष आहे. असे असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात राजधानी दिल्ली येथे भेट झाली आहे. या भेटीमुळे राजधानी दिल्लीसह थेट महाराष्ट्राच्या राजकारणातही (Maharashtra Politics) मोठ्या प्रमाणावर चर्चा आणि तर्कवितर्क सुरु झाले आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या भेटीचा तपशील अद्याप तरी सार्वजनिक झाला नाही. त्यामुळे उत्सुकता अधिकच वाढली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये साधारण 20 ते 25 मिनीटे चर्चा झाली.

शरद पवार हे सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही आघाड्यांवर संवाद साधण्यात माहीर आहेत. आजवरच्या राजकारणातील तो त्यांचा यूएसपी समजला जातो. काही झाले तरी शरद पवार हे कट्टर विरोधकांसोबतही संवाद तोडत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र असो वा दिल्ली. सर्वांसोबत शरद पवार यांचे संबंध तितकेच मजबूत आणि चांगले असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली याबाबत प्रचंड उत्सुकता आहे.

विशेषत: दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या भेटीची वेळ अधिक महत्त्वाची मानली जात आहे. एका बाजूला भाजपचे नेते महाविकासआघाडीवर जोरदार टीका करत आहेत. दुसऱ्या बाजूला केंद्रीय तपास यंत्रणा या महाविकासआघाडीमधील मंत्री आणि नेत्यांवर कारवाईचा धडाका उडवून देत आहेत. त्यामुळे आगामी काळात राज्य आणि देशाचे राजकारण वेगळ्या वरणावर जाण्याची चिन्हे आहेत. असे असताना या दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या भेटीची जोरदार चर्चा झाली नाही तरच नवल.