शरद पवार यांची मरकजवर टिपण्णी; दिल्लीतील घटना वारंवार टीव्हीवर दाखवणे गरजेचे आहे का म्हणत केला सवाल
Sharad Pawar | (Photo Credits: Facebook)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी काही वेळापूर्वी फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दिल्लीतील मरकज (Delhi Markaz) प्रकरणावरून खास टिपण्णी केली, अलीकडे सर्व वृत्तवाहिन्या वारंवार मरकज बाबत घडलेला प्रकार दाखवत आहेत, मात्र असे केल्याने एखाद्या धार्मिक वर्गाला टार्गेट केले जात आहे. अशा बातम्या सतत दाखवणे गरजेचे आहे का? असा सवालही त्यांनी केला आहे. यासोबतच व्हॉटसऍप वरून व्हायरल होणाऱ्या अनेक मॅसेजेसच्या बाबत बोलताना, त्यांनी दर पाच व्हायरल होणाऱ्या मॅसेज मध्ये चार मॅसेज हे खोटे निघतात, हे संभ्रम तयार करण्याचे काम आहे जे त्वरित थांबायला हवे असेही म्हंटले आहे. Coronavirus: कोरोना व्हायरस संकटातून बाहेर पडण्यासाठी केंद्राने राज्यांना आर्थिक पॅकेज देणे आवश्यक - शरद पवार

शरद पवार यांनी दिल्लीतील घटनेची निंदा करत देशात कोरोनाचा प्रादुर्भाव असताना अशा परिस्थितीत दिल्लीत मरकजचा धार्मिक मेळावा व्हायला नको होता. महाराष्ट्र सरकारने जशी मरकजच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली, तशीच दिल्लीतही परवानगी नाकारायला हवी होती. दिल्लीत थोडी खबरदारी घेतली असती तर बरंच नियंत्रण आलं असतं, असं म्हंटल आहे. तर महाराष्ट्रात पोलिसांनी कोरोना व्हायरस संकट विचारात घेऊन मरकज ला परवानगी नाकारल्या बाबत शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख आणि महाराष्ट्र पोलीस यांचे कौतुक केले.

शरद पवार लाईव्ह व्हिडीओ

दरम्यान, आपल्या लाइव्हच्या शेवटी पुन्हा एकदा शरद पवारांनी प्रसारमाध्यमांना बातम्या दाखवताना भान ठेवण्याचे आवाहन केले. या संकटकाळात सामाजिक समतोल ढासळेल आणि कटुता वाढणार नाही, याची काळजी घेण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.