Coronavirus: कोरोना व्हायरस संकटातून बाहेर पडण्यासाठी केंद्राने राज्यांना आर्थिक पॅकेज देणे आवश्यक - शरद पवार
NCP Chief Sharad Pawar | (Photo Credits: Faceboo

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटातून बाहेर पडण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारला विशेष आर्थिक पॅकेज देणे आवश्यक आहे. तसेच, देशभरातील शेतकऱ्यांना आवश्यक ते मार्गदर्शनही देण्याची आवश्यकता आहे, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. लॉकडाऊन काळात शरद पवार यांनी फेसबुक (Facebook) लाईव्हच्या माध्यमातून साधलेला हा दुसरा संवाद आहे.

या वेळी बोलताना शरद पवार म्हणाले, कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारे गर्दी टाळण्याची आवश्यकता आहे. आपण सर्वांनी ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. खास करुन जाहीर कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम टाळायला हवेत. दिल्ली येथे झालेले धार्मिक संमेलन आयजित करण्याची काहीच आवश्यकता नव्हती. कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊन काळात असे संमेलन आयोजित करणे योग्य नव्हते. या संमेलनास मुळात परवानगीच देणे योग्य नव्हते, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. दरम्यान, मरकजची घटना वारंवार प्रसारमाध्यमांमधून दाखवण्याची गरज आहेच का? असा सवाल विचारत शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांबाबतही नाराजी व्यक्त केली.

दिल्ली येथे झालेल्या मरकज कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्रात करण्यात आले होते. मात्र, महाराष्ट्र पोलिसांनी त्याला कोरोना व्हायरस संकट विचारात घेऊन परवानगी नाकारण्यात आली. त्याबद्दल शरद पवार यांनी राज्याचे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख आणि महाराष्ट्र पोलीस यांचे कौतुकही शरद पवार यांनी केले. याच वेळी शरद पवार यांनी सोलापूर आणि इतर काही जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यती आणि काही यात्रांच्या आयोजनाबाबत पवार यांनी नाराजी व्यक्त केली. (हेही वाचा, निजामुद्दीन, दिल्लीतील घटनांचा वापर करुन दिशाभूल करणारे व्हिडिओ सोशल मीडियात पसवरुन धार्मिक तेढ निर्माण केल्यास कठोर कारवाई होणार)

शरद पवार फेसबुक लाईव्ह इथे पाहा

सोशल मीडियातून व्हायरल केल्या जाणाऱ्या संदेश, व्हिडिओ आदींवर विश्वास ठेऊ नका. सोशल मीडियावर येणाऱ्य़ा 5 पैकी 4 मेसेज हे खोटे असतात. त्यामुळे सोशल मीडियावर विश्वास ठेवताना काळजी घ्या, असेही शरद पवार यांनी या वेळी सांगितले. शरद पवार यांनी या वेळी अनेक युजर्सकडून फेसबुकवर विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरेही दिली.