Maharashtra Co-operative Bank Scam: शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे मराठवाड्यात अनेक ठिकाणी कडकडीत बंद
NCP Chief Sharad Pawar (Photo: Facebook)

आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) अध्यक्ष, खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर ईडीने (ED) गुन्हा दाखल केला आहे. राजकीय द्वेषापोटी रचलेली ही एक खेळी आहे असे समजून, याच्या निषेधार्त आज मराठवाड्यात ठिकठिकाणी बंद पाळण्यात येत आहे. बुधवारी याबाबत राज्यात अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली होती. त्यानंतर आज औरंगाबादसह अनेक ठिकाणी बंदची हाक देण्यात आली आहे. जालना, उस्मानाबाद, बीड, परळी, लातूर, लेणापुर, नांदेड, परभणी, हिंगोली अशा मोठ्या शहरांसह ग्रामीण भागातही हा बंद पाळण्यात येत आहे.

औरंगाबाद शहरात काल राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठी निदर्शने केली. त्यानंतर परळी बंदची हाक देण्यात आली. याच पार्श्वभूमीवर काल पुण्यातही मोठी निदर्शने घडली व बारामती बंद ठेवण्यात आली होती. उद्या शरद पवार ईडीच्या कार्यालयात दाखत होणार आहे. त्यामुळे या चौकशीमधून नक्की काय बाहेर येईल याकडे राज्यासह देशाचेही लक्ष लागले आहे. शरद पवार व अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर 24 सप्टेंबर रोजी सक्तवसुली संचलनालयाकडून महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा (Maharashtra State CO-Op Bank Scam) प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. (हेही वाचा: Maharashtra Cooperative bank scam case: येत्या 27 सप्टेंबरला अंमलबजावणी संचालनालय कार्यालयात उपस्थित राहणार: शरद पवार)

दरम्यान, सन 1961 मध्ये स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत (Maharashtra State CO Bank) तब्बल 25 हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला असून, यामध्ये अनेक बड्या राजकीय नेत्यांचा समावेश असल्याचा आरोप आहे. अजित पवार या बँकेच्या संचालक पदी होते. अजित पवार यांच्यासह विजयसिंह मोहिते-पाटील, आनंदराव अडसूळ, शिवाजीराव नलावडे सोबतच इतर तब्बल 50 अनेक नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हा गुन्हा रद्द करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला होता, त्यानंतर आता शरद पवार यांचेही नाव या प्रकरणात गोवले गेले आहेत.