Sharad Pawar Marriage Story: महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य अशी ज्यांची ओळख आहे अशा शरद पवार यांचा आज वाढदिवस. महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात जन्म घेतलेले पवार यांनी केवळ आपल्या दूरदृष्टी व शांत, संयमी स्वभावाच्या बळावर केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरातील राजकारणात एक वेगळं स्थान निर्माण केलं. कॉलेजात असताना विद्यार्थी संघटनेचे नेते ते एका राष्ट्रीय पक्षाचे संस्थापक अध्यक्ष असा त्यांचा एकूण राजकीय प्रवास आहे. परंतु या थोर व्यक्तिमत्त्वाला, त्यांच्या सासऱ्यांनी मात्र प्रतिभा ताईंसाठी नकार दिला होता. हो, शरद पवार यांना त्यांच्या सासऱ्यांनी लग्नाच्या परीक्षेत फेल केलं होतं. चला तर जाणून घेऊया काय होती शरद पवार यांची लव्ह स्टोरी.
शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार या पुण्यातील सदू शिंदे या प्रसिद्ध माजी कसोटी क्रिकेटपटू यांच्या कन्या आहेत. सदू शिंदे यांना त्यांच्या मुलींसाठी जेव्हा शरद पवार यांचे स्थळ सुचवण्यात आले होते तेव्हा मुलगा काहीच करत नाही असं सांगण्यात आलं होतं. ‘एक मुलगा आहे. ग्रॅज्युएट आहे. बीकॉम झाला आहे. पण स्वत: काही करत नाही. गावाकडे शेती आहे. नुकताच आमदार झाला आहे,’ असं स्थळ सुचवणाऱ्यांनी सांगितलं. काहीच करत नाही हे ऐकून सदू शिंदे यांनी शरद पवार यांना नापसंत केले. पण नंतर त्यांना कळले की शरद पवार हे बापूसाहेब यांचे लहान बंधू आहे. त्याकाळी बापूसाहेबांचे खूप नाव होते. अखेर बापूसाहेबांनी स्वतः सदू शिंदे यांना भेटून लग्नाची बोलणी करून त्यांचा होकार मिळवला होता.
अशा रितीने 1 ऑगस्ट 1967 रोजी शरद पवार आणि प्रतिभा पवार यांचा विवाह बारामतीत झाला. बारामतीत त्या दिवशी प्रचंड पाऊस पडत होता. तसं असूनही, शरद पवारांच्या लग्नसोहळ्याला सगळ्या पंचक्रोशीतील हजारो माणसे उपस्थित होती.