Sharad Pawar (Photo Credits: Getty)

महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार (Sharad Pawar) यांनी घेतलेल्या मेहनतीचे फळ अखेर मिळालेच. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. मुख्यमंत्री शपथविधीचा सोहळा पार पडल्यावर आता चर्चा सुरु झाली आहे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाची. शरद पवार 12 डिसेंबर रोजी 80 व्या वर्षांत पदार्पण करणार आहेत. राष्ट्रवादीकडून हा दिवस बळीराजाला समर्पित केला जाणार आहे. हा दिवस ‘बळीराजा कृतज्ञता दिन’ म्हणून साजरा करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी दिली आहे. शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त 80 लाखांचा निधी शेतकऱ्यांसाठी जमा केला जाणार आहे.

यंदा हा वाढदिवस साजरा करण्याऐवजी त्याचा होणारा खर्च शेतकऱ्यांना सुपूर्त करण्यात येणार आहे. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी 80 लाखांचा निधी उभा करून राष्ट्रवादी वेलफेअर फंडात जमा केला जाईल. सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून सुमारे 2 लाखांचा निधी एकत्र केला जाईल. जो शेतकरी अडचणीत आहे त्याला या माध्यमातून दिलासा देण्यात येईल अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली. (हेही वाचा: अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ठेवली होती 'ही' अट; शरद पवार यांनी केला गौप्यस्फोट)

वाढदिवसाच्या दिवशी म्हणजेच 12 डिसेंबर रोजी, दुपारी 12 वाजेपर्यंत शरद पवार शुभेच्छा स्वीकारतील. हा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथे पार पडेल. यावेळी हार तुरे अशा गोष्टींच्या ऐवजी शेतकऱ्यांसाठी निधी जमा केला जाऊ शकतो. या दिवशी क्रीडा स्पर्धा, पर्यावरण रक्षणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तसेच रुग्णालयात फळवाटपही केले जाणार आहे. या वाढदिवसाचे औचित्य साधून, 11 ते 20 डिसेंबर या कालावधीमध्ये सरकारी, पालिकेच्या रुग्णालायत स्वछता अभियान राबवले जाणार आहे.