अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ठेवली होती 'ही' अट; शरद पवार यांनी केला गौप्यस्फोट
File Image of NCP chief Sharad Pawar | (Photo Credits: PTI)

महाराष्ट्र राज्यात सत्ता स्थापनेचा संघर्ष जवळपास दीड महिना सुरु होता. अनेक पक्षांतील नेत्यांनी खलबतं केली, एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आणि या सर्वात राष्ट्रपती राजवट देखील लागली. परंतु या सर्वाला पूर्णविराम लागला तो शिवसेना- काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केलं तेव्हा. पण त्या आधी अजित पवार यांनी अचानक देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत केलेल्या हातमिळवणीमुळे काही प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहेत.

शरद पवार यांनी नुकत्याच एबीपी या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत यातील काही प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. तसेच अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी हातमिळवणी करण्याआधी एक अट घातली असल्याचा गौप्यस्फोट केला.

शरद पवार म्हणाले की, "भाजपसोबत हातमिळवणी करताना अजित पवारांनी त्यांच्यासमोर एक अट ठेवली होती. अजित पवार फडणवीसांना म्हणाले होते की, आजच्या आज जर तुम्ही शपथ घेणार असाल, तर आम्ही हे सगळं करण्यास तयार आहोत."

इतकंच नव्हे तर या मुलाखतीदरम्यान शरद पवार यांनी स्वतःची बाजू देखील स्पष्ट केली. त्यांना यातलं काहीच माहित नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला पंकजा मुंडे यांच्या ट्विटला उत्तर; गोपीनाथ मुंडे यांचा केला उल्लेख 

दरम्यान शरद पवार हे देखील म्हणाले की सुरुवातीच्या काळात अजित पवार त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी भेटायला बोलावलं असल्याने जाऊ का, अशी विचारणा करत होते. त्यावर शरद पवार त्यांना जा म्हणाले आणि त्यानंतर असं काही होईल याची कल्पना त्यांना नसल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे.