मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला पंकजा मुंडे यांच्या ट्विटला उत्तर; गोपीनाथ मुंडे यांचा केला उल्लेख
Pankaja Munde (Photo Credits: Facebook)

पंकजा मुंडे यांच्या नव्या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. पंकजा कायमच भाजपच्या महिला नेत्यांमध्ये आघाडीवर दिसल्या आहेत. परंतु त्यांनी नुकतीच आपल्या कार्यकर्त्यांना उद्देशून लिहिलेली पोस्ट आणि ट्विटर हॅण्डलवरून 'भाजप' चा उल्लेख हटवल्याने अनेक राजकीय चर्चांना उधाण आले आहे. त्यात त्या शिवसेनेत तर जाणार नाही ना? असाही सवाल सध्या राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. संजय राऊत यांनी आज अनेक भाजपचे नेते हे शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक खुलासा केला आहे. तर दुसरीकडे चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडे या भाजप सोडणार असल्याच्या बातम्या खोट्या असल्याचे माध्यमांना सांगितले आहे.

त्यात आणखी भर म्हणजे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंकजा यांच्या ट्विट ला आज दिलेले उत्तर. 28 नोव्हेंबर रोजी पंकजा यांनी उद्धव ठाकरे यांना उद्देशून ट्विट केले की, "आदरणीय व प्रिय उद्धवजी यांना मनःस्वी शुभकामना!! एका ठाकरेनी पहिल्यांदा निवडणूक लढविली आणि एक मुख्यमंत्री झाले..हार्दिक अभिनंदन!! महाराष्ट्रातील संस्कृती व परंपरा हीच आहे ‘राज्याचे हित प्रथम ‘!! राज्याच्या नवीन मुख्यमंत्र्यांना राज्याच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा!!"

'पंकजा मुंडे भाजप सोडणार का?' पाहा काय म्हणाले चंद्रकांत पाटील

मात्र या ट्विट ला उद्धव ठाकरे यांनी आज उत्तर दिले आहे. ते लिहितात, “आपले मनःपूर्वक धन्यवाद, पंकजा ताई मुंडे! ‘राज्याचे हित प्रथम’ याच संस्कृतीने आणि परंपरेने महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार महाराष्ट्राच्या हितासाठी काम करेल आणि स्व. गोपीनाथ मुंडे साहेब यांना अभिप्रेत असा महाराष्ट्र घडवेल असा विश्वास मी तुम्हाला देतो.”