एकनाथ शिंदे गटातील आमदार शहाजी बापू पाटील (Shahajibapu Patil) यांच्या ताफ्यातील एका वाहनाला अपघात (Accident) झाला आहे. या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर आणखी एक जखमी झाला आहे. ताफ्यातील एका पोलीस वाहनाला भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीस्वाराने धडक दिली. ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शिबिरासाठी शहाजीबापू पाटील उपस्थित होते. या शिबीराहून परतत असताना हा अपघात घडला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शिबिराचा कार्यक्रम आटोपून शहाजीबापू पाटील हे आपल्या ताफ्यासह परतत होते. दरम्यान, सांगोला शहराकडे परत येत असताना ही घटना घडली. शहाजीबापू पाटील यांच्या वाहनापुढे पोलिसांच्या संरक्षक गाडीचा ताफा होता. हा ताफा माळवाडी येथील नाजरा नजीक आला. दरम्यान, एक भरधाव वेगातील दुचाकीस्वार पोलिसांच्या वाहनावर येऊन धडकला. धडक इतकी जोरदार होती की यात एकाचा जागीच मृत्यू झाला. (हेही वाचा, Shahajibapu Patil यांनी घटवलं 8 दिवसांत 9 किलो वजन...सर्वत्र नव्या लूकची चर्चा)
अपघाताची घटना घडल्याचे वृत्त समजताच स्थानिक नागरिकांनी गर्दी केली. सुरुवातीला हा अपघात आमदारांच्या ताफ्यातील वाहनासोबत झाल्याचे नागरिकांना माहिती नव्हते. मात्र, आमदार पाटील यांच्या ताफ्यातील वाहनासोबत अपघात घडला आहे. तसेच, आमदार स्वत: घटनास्थळी आहेत हे जेव्हा नागरिकांना कळले तेव्हा नागरिकांनी आणखी गर्दी केली. जमलेल्या गर्दीमुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, तोवर स्थानिक पोलिसांशी संपर्क झाला होता. पोलिसानी घटनास्थळी येऊन गर्दी पांगवली. मृतदेह ताब्यात घेऊन जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले.