महाराष्ट्रामध्ये मागील वर्षी जून महिन्यात झालेल्या सत्तांतराच्या वेळेस आपल्या डायलॉगबाजीने चर्चेमध्ये आलेले आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहेत. शहाजीबापूंनी आठ दिवासांमध्ये चक्क 9 किलो वजन घटवल्याची किमया साधली आहे. नव्या आणि अधिक फीट अंदाजामध्ये शहाजीबापू जनतेसमोर येतील अशी चर्चा असतानाच आता कसे दिसतात याची चर्चा सोशल मीडीयामध्ये सुरू झाली आहे. काही फोटो देखील झपाट्याने शेअर केले जात आहेत.
नागपूर मध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये सुरूवातीच्या 2 दिवसांनंतर अचानक गायब गेल्यानंतर शिवसेनेच्या सुषमा अंधारेंकडून त्यांच्यावर टीकास्त्र डागण्यात आलं होतं. पण शहाजीबापूंनी त्यांना प्रत्युत्तर दिले नव्हते. तेव्हापासूनच बापू नेमके गेले कुठे? असा प्रश्न विचारायला सुरूवात झाली आणि आता त्याचा उलगडा झाला आहे. शहाजीबापू सध्या वजन कमी करण्यासाठी बंगळूरू मधील श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात असल्याची माहिती समोर आली आहे.
मीडीया रिपोर्ट्सनुसार, शहाजीबापू पाटील 24 डिसेंबर पासून बंगळूरूला रविशंकरांच्या आश्रमात आहे. तेथेच वजन घटवण्यासाठी जीवनशैलीमध्ये बदल केले आहेत. बापूंचा दिनक्रम सकाळी 5 वाजता सुरू होतो. त्यानंतर दोन तास योगाभ्यास करतात. वाफवलेल्या भाज्या, कडधान्य यांचा नाश्ता त्यानंतर ध्यान धारणा केली जाते. दुपारच्या जेवणातही सात्विक शाकाहारी भोजन केले जाते. सुदर्शन प्रक्रिया, व्यायाम आणि संध्याकाळी पुन्हा ध्यान करणं असा त्यांचा दिनक्रम होता. काल बापूंच्या शिबिराचा शेवटचा दिवस होता. शहाजीबापू पाटील काल सांगोल्याला रवाना झाले आहेत.