महाराष्ट्रातील नाशिक (Nashik) जिल्ह्यात लवकरच कलम 144 (Section 144) लागू करण्यात येणार आहे. कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिसांनी दाटीवाटीच्या ठिकाणी कलम 144 लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. कलम 144 अंतर्गत पाच किंवा अधिक लोकांना एकत्र फिरण्याची, भेटण्याची तसंच हत्यारं बाळगण्याची परवानगी नाही. कलम 144 लागू करण्याचे आदेश लवकरच देण्यात येतील, असे नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडे (Nashik Police Commissioner Deepak Pandey) यांनी सांगितले आहे.
अलिकडेच नाशिकच्या पालिका आयुक्तांनी शहर पोलिसांना यासंदर्भात पत्र लिहिले आहे. या पत्रात शहरातील 14 ठिकाणी कलम 144 लागू करण्याची विनंती करण्यात आली आहे. यात भद्रकाली, रविवार कारंजा, त्रिमूर्ती चौक, द्वारका, सिटी सेंटर मॉल परिसर, सेंट्रल बस स्टँड, निमानी बसस्थानक, मेहर सर्कल, शालीमार, बायको चौक, रेल्वे स्टेशन परिसर, दत्ता मंदिर चौक, लेख नगर आणि पाथर्डी फाटा या भागांचा समावेश आहे. त्यानंतर पोलिसांनी विनंतीला मान देऊन कलम 144 लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
"कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांत नाशिक महानगरपालिका आणि पोलिसांमध्ये एकवाच्यता आहे. नाशिक महानगरपालिकेने कलम 144 लागू करण्याचा विषय मांडल्यानंतर पोलिसांनी देखील त्याला सहमती दर्शवली. तसंच नियमांचे उल्लंघन होऊ नये म्हणून जागोजागी पोलिस बंदोबस्त देखील असेल," असे नाशिकचे पालिस आयुक्त दीपक पांडे यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले.
कोरोना बाधितांच्या संख्येत महाराष्ट्र राज्य सुरुवातीपासूनच प्रथम स्थानी आहे. राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 13,00,757 वर पोहचला असून 34,761 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान सध्या 9,92,806 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून 2,72,775 सक्रीय रुग्ण आहेत. यापैकी नाशिकमध्ये 70,051 कोरोनाग्रस्त रुग्ण असून त्यातील 54,045 वर मात केली आहे. तर 14,771 सक्रीय रुग्ण आहेत. जिल्हातील कोरोना बळींचा आकडा 1235 वर पोहचला आहे. (परभणीत आजपासून 5 दिवस जनता कर्फ्यू, कामाशिवाय घराबाहेर पडल्यास होणार कारवाई)
दरम्यान, राज्यातील कोरोना बाधितांचा वाढता आकडा नियंत्रणात आणण्यासाठी राज्यात 15 सप्टेंबरपासून 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' अभियानाला सुरुवात झाली आहे. परभणी जिल्ह्यातही आजपासून पाच दिवसांसाठी जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.