नागरिकत्व दुरूस्ती कायद्यावरून (CAA) दिल्ली (Delhi) येथे मोठा हिंसाचार पाहायला मिळाला आहे. दिल्लीतील हिंसाचारात आतापर्यंत 46 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर अनेकजण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. दिल्ली येथील हिंसाचाराच्या निषेधार्थ मुंबई (Mumbai) येथील नागरिकांकडून मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी अंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली होती. महत्वाचे म्हणजे, मुंबईत नागरिक मोठ्या संख्येत एका ठिकाणी जमा झाल्याने हिंसाचार निर्माण होऊ शकतो. यामुळे आज मुंबई पोलिसांनी यासंदर्भात घोषणा केली असून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कलम 144 (Section 144) लागू करण्यात आले आहे. तसेच येत्या 9 मार्चपर्यंत रॅली, आंदोलन, आतिशबाजी यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
उत्तर दिल्ली येथील जाफराबाद परिसरातील मेट्रोच्या स्थानकाखाली 22 फेब्रुवारी रोजी नागरिकत्व कायद्याला विरोध करणाऱ्या महिलांची गर्दी जमू लागली होती. या महिलांनी मेट्रो स्थानकाखालील एका बाजूचा रस्ता बंद केला आणि अंदोलनास सुरुवात केली. त्यावेळी नागरिकत्व कायद्याच्या समर्थकांनीही मोर्चा काढला. दरम्यान, नागरिकत्व दुरूस्ती कायदा समर्थक आंदोलन करत विरोधकांपर्यंत पोहचून घोषणाबाजी करू लागले. त्यानंतर दोन्ही गटात वाद सुरु झाला आणि दिल्ली शहराला हिंसाचाराचे वळण मिळाले. दिल्ली येथील नागरिकत्व दुरूस्ती कायद्याला विरोध करणाऱ्यांवर समर्थकांनी हल्ला केल्याचे समजताच मुंबईतही संतापजनक वातावरण निर्माण झाले. यामुळे मुंबईतही अशांतता निर्माण होऊ नये, यासाठी मुंबई पोलिसांनी महत्वपूर्ण घोषणा केली असून कायदा आणि सुवव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कलम 144 लागू करण्यात आले आहे. हे देखील वाचा- मुंबईत आजपासून प्लॅस्टिकवर कडक बंदी! वापर करताना आढळल्यास बसणार 'इतका' दंड
शाहीन बागच्या निदर्शकांनी ईशान्य दिल्लीतील हिंसाचाराविरोधात 1 मार्च रोजी शांतता मोर्चाची घोषणा केली होती. खबरदारीचा उपाय म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस दल तैनात करण्यात आला आहेत. शांतता कायदा व सुव्यवस्था राखणे हे पोलिसांचे मूळ उद्दीष्ट आहे. कोणत्याही अनपेक्षित घटनेसाठी पोलिसांनी ही तयारी केली आहे, असे दिल्ली पोलीस सहआयुक्त डी.सी. श्रीवास्तव म्हणाले होते.