Maharashtra Minister Vijay Wadettiwar (Photo Credits-ANI)

गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यासह राज्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा (ZP School) 3 ऑगस्टपासून सुरु करण्यात येणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी दिली आहे. वडेट्टीवार यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांची आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

यावेळी वडेट्टीवार यांनी सांगितलं की, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यात 3 ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याचा शासनाचा मानस आहे. त्यापूर्वी सर्व शाळा सॅनिटायझ करून घ्याव्यात. तसेच शाळांना मास्क, सॅनिटायझर अशा आवश्यक वस्तू तातडीने पुरवाव्यात, अशा सूचनादेखील वडेट्टीवार यांनी यावेळी दिल्या. (हेही वाचा - पालघरमध्ये 24 तासांत 337 नव्या कोरोना रुग्णांची भर; जिल्ह्यातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 11 हजार 740 वर पोहोचला)

दरम्यान, चंद्रपूर आणि गडचिरोली दोन्ही जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे. या जिल्ह्यात ऑनलाईन शिक्षणाची आवश्यक साधने उपलब्ध नाहीत. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण शक्य नसल्याने विचार करुन या दोन्ही जिल्ह्यांमधील जिल्हा परिषद शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला, असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यासोबत चर्चा केल्याचंदेखील वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.