सातारा लोकसभा मतदारसंघ: उदयनराजे भेसले विजयाची हॅट्रिक मारणार की, भाजप-शिवसेना युतीचे नरेंद्र पाटील इतिहास बदलणार?
BJP-Shivsena candidate Narendra Patil and NCP candidate Udayan Raje Bhosale | (फोटो सौजन्य-फेसबुक)

सातारा लोकसभा मतदारसंघ (Lok Sabha Constituency) हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचा बालेकिल्ला. 1996 ते 1998 हा एकमेव अपवाद वगळता हा मतदारसंघ सुरुवातीला काँग्रेस आणि 1999 पासून कायम राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहिला आहे. क्रांतीसिंह नाना पाटील, किसन महादेव वीर उर्फ आबासाहेब वीर, यशवंतराव चव्हाण यांच्यासारखे दिग्गज नेतृत्व देणारा हा मतदारसंघ. लोकसभा निवडणूक 2019 साठी या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उमेदवार उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosale) विरुद्ध शिवसेना उमेदवार आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अध्यक्ष नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांच्यात सामना आहे. तसेच, वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) तर्फे सहदेव ऐवळे आणि बसपकडून आनंदा थोरवडे हे उमेदवार देखील रिंगणात आहेत.

पश्चिम महाराष्ट्रात उदयनराजे भोसले यांच्या विरुद्ध युतीचा उमेदवार कोण याबाबत मोठी उत्सुकता होती. शिवसेना भाजप युतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आला. शिवसेनेने येथून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अध्यक्ष नरेंद्र पाटील यांना उमेदवारी दिली आणि उदयनराजे यांच्या विरोधात कोण? याची उत्सुकता संपली. आपापल्या उमेदवाराच्या प्रचारार्थ दोन्ही उमेदवाराचे कार्यकर्ते आणि राजकीय पक्षांनी आघाडी घेतली होती. त्यामुळे आता जनतेचा कौल कोणाला याबाबत मोठी उत्सुकता आहे.  (हेही वाचा, महाराष्ट्राचे राजकारण ढवळून टाकणारे बहुचर्चीत लोकसभा मतदारसंघ आणि लक्ष्यवेधी लढती)

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अध्यक्ष नरेंद्र पाटील यांना रिंगणात उतरवून शिवसेनेने राष्ट्रवादीच्या उदयनराजेंना शह देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, त्यात शिवसेना किती यशस्वी होते हे कळण्यास निवडणू निकालापर्यंत वाट पाहावी लागणार आहे. मराठा क्रांती मोर्चा, माथाडी कामगारांचे प्रश्न आती कार्यातून नरेंद्र पाटील यांचा लोकसंपर्क असतो. युतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ शिवसेनेला सुटल्यामुळे नरेंद्र पाटील यांनी शिवसेनेची उमेदवारी घेतली. शिवसेनेत येण्यापूर्वी ते भाजपमध्ये होते. (हेही वाचा, बुलढाणा लोकसभा मतदारसंघ: शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी सामना रंगणार, VBA ठरणार किंगमेगर)

सातारा लोकसभा मतदारसंघात येणारे विधानसभा मतदारसंघ

·         वाई विधानसभा मतदारसंघ

·         कोरेगांव विधानसभा मतदारसंघ

·         कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ

·         कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ

·         पाटण विधानसभा मतदारसंघ

·         सातारा विधानसभा मतदारसंघ

या आधीच्या निवडणुकांचा इतिहास पाहिला तर, गेल्या काही वर्षांत लोकसभा निडवणुकीत सातारा मतदारसंघात उदयनराजे फॅक्टरच चालल्याचे पाहायला मिळते. रांगडी भाषा आणि हटके स्टाईल हे उदयनराजे यांच्या व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य. भाषणादरम्यान चित्रपटातील डायलॉग फेकणे आणि शर्टची कॉलर उडवणे या उदयनराजे यांच्या स्टाईलवर त्यांचे चाहते आणि कार्यकर्ते नेहमीच फिदा असतात. असे असले तरी, या वेळी साताऱ्याची जनता कोणाला आपला प्रतिनिधी म्हणून निवडते हे प्रत्यक्ष निकाला दिवशीच कळणार आहे.