महाराष्ट्रातील राजकीय पक्ष बोधचिन्ह प्रतिमा | (Photo credit: archived, edited and representative images only)

Leading And Challenging Lok Sabha Constituencies In Maharashtra: लोकसभा निवडणूक 2019 (Lok Sabha Elections 2019) देशभरात पार पडत आहे. ही निवडणूक एकूण 543 जागांसाठी होत आहे. यात महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघांचाही समावेश आहे. अर्थात राज्यभरात आणि देशभरातील सर्वच मतदारसंघ महत्त्वाचे असले तरी चर्चेत नसतात. आज आम्ही महाराष्ट्राचे राजकारण ढवळून टाकणाऱ्या आणि राज्याच्या राजकारणावर दुरगामी परिणाम करणाऱ्या काही चर्चित, तुल्यबळ आणि सर्वार्थाने लक्ष्यवेधी अशा लोकसभा मतदारसंघांवर ( Most Popular Lok Sabha Constituencies in Maharashtra) नजर टाकणार आहोत.

मावळ लोकसभा मतदारसंघ (Maval Lok Sabha Constituency)

मावळ लोकसभा मतदारसंघ हा पुणे आणि रायगड अशा दोन जिल्ह्यांतील विधानसभा मतदारसंघांनी बनलेला. गेली काही वर्षे या मतदारसंघावर शिसेनेचे वर्चस्व पाहायला मिळाले. 2014 च्या निवडणुकीत श्रीरंग बारणे हे शिसेनेच्या तिकिटावरुन खासदार झाले. या वेळीही (लोकसभा निडणूक 2019) भाजप शिवसेना युतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आला. इथे शिवसेनेने श्रीरंग बारणे यांनाच उमेदवारी दिली आहे. मात्र, काँग्रेस, राष्ट्रवादी महाआघाडीच्या जागावाटपात हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने इथे पार्थ पवार या हेवीवेट चेहऱ्याला रिंगणात उतरवले आणि मतदारसंघातील राजकारणाला एक वेगळेच वलय प्राप्त झाले. पार्थ पवार हे थेट राष्ट्रवादीची पॉवरफूल फॅमेली असलेल्या पवार कुटुंबातील सदस्य. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू तर, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील दादा नाव अजित पवार यांचे चिरंजीव. त्यामुळे गेली अनेक वर्षे या मतदारसंघातून शिवसेनेचा उमेदवार निवडूण आला असला तरी, या वेळी पार्थ पवार यांच्या तगड्या उमेदवारीमुळे हा मतदारसंघ चांगलाच लक्षवेधी ठरला आहे.

शिरुर लोकसभा मतदारसंघ (Shirur Lok Sabha Constituency)

शिरुर लोकसभा मतदारसंघ हासुद्धा पुणे जिल्ह्याशी संबंधीतच एक मतदारसंघ. तसा पाहिला तर शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणावा असा. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या रुपात गेली अनेक वर्षे शिवसेनेचा उमेदावर या मतदारसंघातून निवडूण येत आहे. आताही शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हेच धनुष्यबाण चिन्हावर रिंगणात आहेत. मात्र, काँग्रेस, राष्ट्रवादी महाआघाडीने या वेळी या मतदारसंघातील निवडणूक ही नेहमीसारखी सोपी ठेवली नाही. डॉ. अमोल कोल्हे यांच्या रुपात शिवसेनेच्याच भात्यातील बाण योग्य वेळी बाहेर काढत राष्ट्रवादीच्या घड्याळाने मतदारसंघात किल्ली फिरवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने डॉ. अमोल कोल्हे यांना या मतदारसंघातून मैदानात उतरवले आहे. डॉ. कोल्हे हा राज्यभर चर्चित असलेला चेहरा. मुळात डॉ. कोल्हे हे अभिनेते आहेत. स्वराज्य रक्षक संभाजी आणि राजा शिवछत्रपती यांच्या जिवनावरील टीव्ही मालिकांतील प्रमुख भूमिकेमुळे ते घराघरात पोहोचले आहेत. त्यामुळे शिवाजीराव अढळराव पाटील यांचा प्रस्थापीत चेहरा विरुद्ध डॉ. अमोल कोल्हे यांचा चर्चित चेहरा अशी ही लढाई आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघ (Satara Lok Sabha Constituency)

सातारा लोकसभा मतदारसंघ म्हटलं की डोळ्यासमोर येते ती खासदार उदयनराजे भोसले यांची प्रतिमा. गेली बरीच वर्षे सातारा लोकसभा मतदारसंघात लोकसभेचे राजकारण उदयनराजे भोसले यांच्या भोवती फिरत आहे. उदयनराजे भोसले यांच्या विरोधात विरोधकांना तसा तुल्यबळ उमेदवार देता आला नव्हता. या वेळी शिवसेना भाजप युतीने माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांना उमेदवारी दिली आहे. आता शिवसेनेचे नरेंद्र पाटील हे उदयनराजेंना कशी आणि किती टक्कर देतात याबाबत उत्सुकता आहे.  (हेही वाचा, बुलढाणा लोकसभा मतदारसंघ: शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी सामना रंगणार, VBA ठरणार किंगमेगर)

नाशिक लोकसभा मतदारसंघ (Nashik Lok Sabha Constituency)

नाशिक लोकसभा मतदारसंघ हा तसा राष्ट्रवादीचा गड. मात्र, 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत या गडाला शिवसेना-भाजपने सुरुंग लावला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच तगडे नेते छगन भुजबळ हे येथून नेतृत्व करतात. 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या हेमंत गोडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार समीर भुजबळ यांना पराभूत केले. वर्ष बदलले तरी उमेदवार तेच आहेत. राजकीय परिस्थिती बदलली असली तरी, संघर्ष जुनाच आहे. हेमंत गोडसे विरुद्ध समीर भुजबळ हा संघर्ष कसे रुप घेतो हे लवकरच समजणार आहे.

नागपूर लोकसभा मतदारसंघ (Nagpur Lok Sabha Constituency)

नागपूर लोकसभा मतदारसंघ हा देखील देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे. नागपूर येथून केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार नितीन गडकरी हे भाजपच्या वतीने मैदानात आहेत. तर, त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून नाना पटोले हे रिंगणात आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय. नाना पटोले यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पक्षांतर्गत बंड, त्यानंतर भाजपला सोडचिठ्ठी देत केलेला काँग्रेस प्रवेश आणि आता थेट लोकसभा निवडणूक हे गणित पाहता या मतदारसंघातील निवडणुकही चर्चेचा विषय ठरली आहे. (हेही वाचा, Lok Sabha Elections 2019: महाराष्ट्र लोकसभा मतदारसंघ आणि काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप उमेदवार संपूर्ण यादी)

सोलापूर लोकसभा मतदारसंघ (Solapur Lok Sabha Constituency)

माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हे सोलापूरमधून काँग्रेसच्या पंजावर निवडणुक लढवत आहेत. विद्यमान खासदाराचे तिकीट कापत भाजपने येथे डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी यांना रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे ही लढत काँग्रेस विरुद्ध भाजप होईल असे चित्र असतानाच वंचित बहुजन आघाडी सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूरमधून उमेदवारी अर्ज दाखल केला आणि तो कायम ठेवला. त्यामुळे सुरुवातीला काँग्रेस विरुद्ध भाजप असा दुरंगी वाटणारा सामना आता तिरंगी झाला आहे. त्यामुळे याही मतदारसंगातील लढतीकडे राज्याचे आणि देशाचे लक्ष लागले आहे. (हेही वाचा, अकोला लोकसभा मतदारसंघ: प्रकाश आंबेडकर यांच्या रुपात वंचित मारणार बाजी की, काँग्रेसला हात दाखवत फुलणार भाजपचे कमळ?)

राज्यातील इतरही काही तुल्यबळ आणि लक्ष्यवेधी लढती

रायगड लोकसभा मतदारसंघ - शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अनंत गीते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री सुनील तटकरे यांच्यात काट्याची टक्कर

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ - शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर विरुद्ध राणा जगजितसिंह पाटील.

परभणी लोकसभा मतदारसंघ - शिवसेना उमेदवार संजय जाधव विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार राजेश विटेकर

बुलडाणा लोकसभा मतदारसंघ - शिवसेनेचे प्रताप जाधव विरुद्ध राष्ट्रवादीचे राजेंद्र शिंगणे असा जोरदार सामना आहे.

वर दिलेल्या मतदारसंघांशिवायही राज्यात अनेक ठिकाणी तुल्यबळ आणि ततक्याच महत्त्वपूर्ण लढती होत आहेत. जसे की सांगली, माढा, अहमदनगर, कोल्हापूर, हातकणंगले, नंदुरबार, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, नांदेड आदी मतदारसंघ.