Sanjay Raut (Photo Credits: ANI)

दोन दिवसांसाठी मुंबई दौऱ्यावर आलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (UP CM Yogi Adityanath) यांना शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी चांगलाच टोला लगावला आहे. मुंबईतील फिल्मसिटी दुसरीकडे हलवणं सोप्पं नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मुंबई दौऱ्यावर आलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातही फिल्म सिटी तयार करणार असल्याचं म्हटलं होतं. तसंच याच पार्श्वभूमीवर ते आज उद्योगजगतातील मान्यवरांशी चर्चा करणार आहेत. यावरुन संजय राऊत यांनी योगी आदित्यनाथांवर निशाणा साधला आहे.

"मुंबईतील फिल्मसिटी दुसरीकडे हलवणं सोप्प नाही. दक्षिण भारतामधील फिल्म इंडस्ट्री देखील फार मोठी आहे. पश्चिम बंगाल व पंजाबामध्येही फिल्मसिटी आहेत. योगीजी, त्या ठिकाणी जाऊन दिग्दर्शक, कलाकारांशी चर्चा करतील का? का मुंबईतच ते असं करणार आहेत?" असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

ANI Tweet:

दरम्यान, योगी आदित्यनाथांनी काल अभिनेता अक्षय कुमार याची भेट घेतली. आज ते उत्तर प्रदेशातील गुंतवणूकीबाबत ज्येष्ठ उद्योगपती, उद्योग समूहांच्या उच्चपदस्थांशी आणि चित्रपट उद्योगातील दिग्गजांशी चर्चा करणार आहेत.

त्याचबरोबर संजय राऊत यांनी भाजप नेत्यांवरही जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रात भाजपा नेते 'अझान'वरून राजकारण करीत आहेत. कोविड-19 संकटादरम्यान धार्मिक स्थळांवर जास्त गर्दी होऊ नये, असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे. शिवसेनेने हिंदुत्व सोडले आहे अशी टीका करणाऱ्यांनी हा 'तमाशा' आता बंद करावा. त्यांनी बेरोजगारी, जीडीपी इत्यादी गोष्टींबद्दल बोलले पाहिजे असे संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, संजय राऊत यांच्यावर उद्या लिलावती रुग्णालयात अँजिओप्लास्टी करण्यात येणार आहे. यासाठी त्यांना आज रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. मात्र पुन्हा छातीत दुखू लागल्याने डॉक्टरांनी अँजिओप्लास्टीचा सल्ला दिला आहे.