शिवसेना मुख प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर पुन्हा अॅन्जिओप्लास्टी (Angioplasty) होणार आहे. दरम्यान मागील काही दिवसांपासून त्यांना ताण आणि थकवा जाणवत असल्याने आज ( 2 डिसेंबर) दिवशी त्यांना मुंबईच्या लीलावती रूग्णालयात दाखल केले जाणार आहे. त्यानंतर अॅन्जिओग्राफी (Angiography)करून अॅन्जिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेतला आहे. असे मीडीया रिपोर्ट्सद्वारा समोर आले आहे. दरम्यान वर्षाभरापूर्वी त्यांच्यावर लीलावती रूग्णालयातच अॅन्जिओप्लास्टी करण्यात आली होती.
टीव्ही 9 च्या वृत्तानुसार, वर्षभरापूर्वी नोव्हेंबर महिन्यात संजय राऊत यांच्यावर हृदयात ब्लॉकेज आढळल्याने दोन स्टेन घालण्यात आल्या होत्या. त्यानंतर आणखी स्टेन टाकणं गरजेचे होते. त्यासाठी एप्रिल 2020 चा काळ ठरवण्यात आला होता. मात्र मार्च महिन्यापासूनच राज्यात कोरोना संकट झपाट्याने पसरू लागल्याने ही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. आता अखेर संजय राऊत यांच्यावर पुढील 1-2 दिवसांत अॅन्जिओ प्लास्टी करून स्टेन टाकल्या जातील . डॉ मॅथ्यू आणि डॉ अजित मेनन संजय राऊत यांच्यावर शस्त्रक्रिया करणार असल्याचं सांगितलं जात आहे.
संजय राऊत हे शिवसेनेचे राज्यसभा खासदार, दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक तसेच पक्षाचे मुख्य प्रवक्ता आहेत. मागील काही दिवसांपासून कंगना प्रकरण, सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरण ते अगदी आज युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मुंबई दौरा यावर सडेतोड प्रतिक्रिया देऊन त्यांनी विरोधकांच्या अनेक आरोप-प्रत्यारोपांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे.