Sanjay Raut | (Photo Credit: Facebook)

शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना पत्रा चाळ प्रकरणात जामीन मिळाला. संजय राऊत यांना जामीन मिळू नये यासाठी अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) म्हणजेच ईडीने (ED) जंग जंग पछाडले. परंतू, संजय राऊत यांच्या वकीलांनी कोर्टात केलेला युक्तीवाद सरस ठरला. परिणामी संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला. संजय राऊत यांना जामीन मिळाल्याचे वृत्त येताच ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी राज्यभर जल्लोश केला. 'ढाण्या वाघ येतोय' असे म्हणत शिवसैनिकांनी जल्लोष केला आहे. महाविकासआघाडीमध्येही आनंदाचे वातावरण आहे. संजय राऊत यांच्या जामीनावर आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, नाना पटोले यांच्यासह वरुण सरदेसाई आणि तमाम शिवसैनिकांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत यांच्या जामीनावर बोलताना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे की, संजय राऊत यांना जामीन मिळाला ही आनंदाची बाब आहे. अलिकडे जे विरोधात बोलता, अन्यायाविरोधात बोलतात आवाज उठवतात त्यांच्यावर आरोप करायचे, बदनाम करायचे, केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव टाकून खोट्या प्रकरणांमध्ये अटक वैगरे करायची असे प्रकार सुरु असतात. परंतू, न्यायालयात या गोष्टी टीकत नाहीत, हेच संजय राऊत यांच्या प्रकरणातून पुढे आल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

संजय राऊत, अनिल देशमुख, नवाब मलिक हे महाविकासाघाडीचे महत्त्वाचे नेते आहे. त्यांना विविध प्रकरणात अडकवून तुरुंगात टाकण्याचे काम झाले. त्यांची बाजू सत्याची असल्याने न्यायालयाच्या दरबारात त्यांना न्याय मिळाला. संजय राऊत आणि अनिल देशमुखयांना जामीन मंजूर झाला. राऊत यांना जामीन झाला याबद्दल त्यांचे अभिनंदन, अशा भावना सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केल्या आहेत.

कोल्हापूर येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय पवार यांनीही संजय राऊत यांच्या जामीनाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. आमचा ढाण्या वाघ परत आलाय. मरण पत्करेन पण शरण जाणार नाही, असे म्हणनारा शिवसेनेचा वाघ परत येतो आहे. हा आनंद अवर्णनीय आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रात हा जल्लोष पाहायला मिळत असल्याचे पवार यानी म्हटले आहे.

दरम्यान, महाविकासआघाडीमधील नेतेही संजय राऊत यांच्या जामीनावर जंयत पाटील, नाना पटोले, रोहीत पवार यांनीही आनंद व्यक्त केला आहे.