मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि अन्वय नाईक (Anvay Naik) यांच्यात 21 जमिनीचे व्यवहार झाल्याची टीका भाजप नेते किरीट सोमय्या (BJP Leader Kirit Somaiya) यांनी केली होती. त्यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले आहे. 'बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर' असं म्हणत त्यांनी ठाकरे कुटुंबियांवर केलेल्या आरोपांचा समाचार घेतला आहे. तसंच त्यांनी सोमय्या यांचा 'व्यापारी अवलाद' असा उल्लेख करत 'शेठजी, जरा जपून' असा सल्ला देखील दिला आहे.
संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, "अन्वय नाईक यांच्याशी 21 व्यवहार केल्याची थाप सोमय्या महोदयांनी मारली आहे. आम्ही म्हणतोय आता बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर. एका भगीनीचे कुंकू पुसलयाचे दु:ख या व्यापारी अवलादीस नाही. तक्रार जमिनीच्या व्यवहारा बाबत नसून भगिनीचे कुंकू पुसण्या बाबत आहे. शेठजी, जरा जपून! जय महाराष्ट्र." (Kirit Somaiya On Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांनी अन्वय नाईक कुटुंबीयांसोबत नेमके काय संबंध आहेत जाहीर करावे- किरीट सोमय्या)
Sanjay Raut Tweet:
अन्वय नाईक यांच्याशी 21 व्यवहार केल्याची थाप सोमय्या महोदयांनी मारली आहे. आम्ही म्हणतोय आता बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर.एका भगीनीचे कुंकू पुसलयाचे दु:ख या व्यापारी अवलादीस नाही. तक्रार जमिनीच्या व्यवहारा बाबत नसून भगिनीचे कुंकू पुसण्या बाबत आहे. शेठजी, जरा जपून!
जय महाराष्ट्र
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 12, 2020
आज (12 नोव्हेंबर) सकाळी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या यांनी ठाकरे आणि नाईक कुटुंबियांमध्ये जमिनीचे 21 व्यवहार झाल्याचे म्हटले होते. तसंच जमिनींच्या या व्यवहारामागे नेमके काय कारण होते, हे स्पष्ट करण्याची मागणीही केली होती. त्याचबरोबर असे अजून काही व्यवहार झाले आहेत का? याचीही आम्ही चौकशी करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी सोमय्या यांनी रश्मी ठाकरे आणि मनीषा रवींद्र वायकर यांनी संयुक्तपणे रायगडमध्ये अन्वय नाईक यांच्याकडून 2.20 कोटींची जमीन खरेदी केली असल्याचे आरोप ट्विटच्या माध्यमातून केला होता. या ट्विटमध्ये त्यांनी काही कागदपत्रंही जोडली होती.
दरम्यान, रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अटक झाल्यानंतर भाजप नेत्यांनी ठाकरे सरकारविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली. या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सत्तेचा वापर करत गोस्वामी यांना लक्ष्य केलं जात असल्याची टीकाही केली जात होती. विशेष म्हणजे काल अर्णब गोस्वामी यांच्या सुटकेनंतर भाजप नेत्यांकडून 'ठाकरे सरकारला चपराक' म्हणत आनंद व्यक्त करण्यात आला होता.