Sanjay Nirupam on Sanjay Raut: शिवसेनेच्या कंपाऊंडरला हेडलाईनमध्ये राहायची भूक लागली आहे- संजय निरूपम
Sanjay Nirupam and Sanjay Raut (Photo Credits: PTI)

भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. तसेच या भेटीचे वेगवेगळे अर्थ काढले जात असून जनताही संभ्रमात आहेत. या भेटीवर काँग्रेस नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी नाव न घेता शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या टीका केली आहे. 'शिवसेनेच्या कंपाऊंडरला हेडलाईनमध्ये राहायची भूक लागली आहे' असे म्हणत त्यांनी ट्विटच्या माध्यमातून त्यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.

संजय निरूपम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'असं वाटतं की शिवसेनेच्या कंपाऊंडरला हेडलाइनमध्ये राहण्याची मोठी भूक लागली आहे. ही भूक नेहमी नेत्यांनाच खाते. ही दुर्भावना नसून वास्तविकता आहे'. Sanjay Raut on Devendra Fadnavis Meet: 'आमच्यामध्ये वैचारिक मतभेद असले तरी आम्ही शत्रू नाही'; देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांचे वक्तव्य

गेल्या काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी एबीपी माझावरील कार्यक्रमात बोलताना मी कधीही डॉक्टरकडून औषध घेत नाही कंपाऊंडरकडून घेतो, त्याला जास्त कळतं असं विधान केलं होतं. या विधानाचाही निरुपम यांनी पुन्हा एकदा समाचार घेतला आहे.

दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी आपली आणि संजय राऊतांची भेट ही कोणतीही राजकीय चर्चेसाठी नसून केवळ त्यांना माझी 'सामना' साठी मुलाखत घ्यायची आहे. त्या संदर्भात बोलण्यासाठी ही भेट झाली असे म्हटले आहे.