सांगली: नाहक मागण्यांच्या त्रासाला कंटाळून एका शिक्षकाचा पोटच्या मुलाला ठार मारण्याचा प्रयत्न; आरोपी अटकेत
Murder | Representational Image | (Photo Credits: stux/Pixabay)

नशेबाज मुलाच्या नाहक मागण्यांच्या त्रासाला कंटाळून एका शिक्षकानी पोटच्या मुलाला ठार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. ही घटना सांगली (Sangli) जिल्ह्यात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या हल्ल्यात पीडित गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर मिरजेच्या मिशन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अज्ञात व्यक्तींनी आपल्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला केला आहे, असे भासवून आरोपीने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, हा हल्ला पीडिताच्या पित्यानेच केला असल्याचे पोलीस चौकशीतून उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

राजेंद्र गाडेकर असे आरोपी पित्याचे नाव आहे. राजेंद्र हा सांगलीच्या 100 फुटी रोड येथील रामकृष्ण परमहंस सोसासटी येथे वास्तव्यास आहे. राजेंद्र याचा मुलगा प्रतिक गाडेकर हा त्याच्या खात्यावर साडेतीन लाख रुपये जमा करून बंगला त्याच्या नावावर करावे, अशी मागणी करत होता. या मागण्यांच्या तगाद्यामुळे राजेद्रने प्रतिकच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच कोणीतरी आपल्या मुलाला ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे, असे भासवून स्थानिक पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस चौकशी दरम्यान सत्यता बाहेर आली आणि आरोपीचे बिंग फुटले, अशी माहिती लोकमतने आपल्या वृत्तात दिली आहे. हे देखील वाचा- गडचिरोली: शेतात रोवणी करीत असताना अंगावर वीज कोसळल्याने एका अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू

याबाबत विश्राम पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपी पित्याला अटक करण्यात आली आहे. तसेच पीडित तरुण हा गंभीर जखमी झाला असून मिरजेच्या मिशन रग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे आजूबाजुच्या परिसरात खळबळजनक वातावरण निर्माण झाले आहे.