Road | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) लोकार्पणासाठी सज्ज होतो आहे. त्याबाबत चर्चा सुरु झाल्या असतानाच या महारामर्गावर अवघ्या तीन दिवसांत अपघाताची दुसरी घटना घडली आहे. त्यामुळे नावात समृद्धी असलेला हा मार्ग भलत्याच कारणामुळे चर्चेत येऊ लागला आहे. समृद्धी महामार्गाच्या पॅकेज 07 मधील सिंदखेडराजा (Sindkhed Raja) जवळील पिंपळखुटा गावाजवळ असलेल्या एका निर्माणाधीन उड्डाणपुलाचे काम सुरु असताना हा अपघात ( Samruddhi Mahamarg  Accident) घडला. हा उड्डाणपूल दोन डोंगराळ प्रदेशांना जोडतो. उड्डाणपुलाचे काम सुरु असतानाच पुलाचे काही गर्डर अचानक कोसळले आणि हा अपघात घडला. बुधवारी सायंकाळी (27 एप्रिल) ही घटना घडली.

सिंदखेडराजा येथे समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, एक ट्रेलर ट्रक गर्डरखाली आल्याने त्याचे मोठे नुकसान झाले. प्राप्त माहितीनुसार पुलाचा एक गर्डर सुमारे 200 टन वजनाचा आहे. सुमारे 80 फूट उंचीवरुन हा गर्डर खाली कोसळला. राज्य सरकार समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनासाठी हालचाल करत असताना अपघाताच्या घटना सातत्याने पुढे येऊ लागल्या आहेत. पाठीमगील दोन दिवसात घडलेली अपघाताची ही दुसरी घटना आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गाच्या कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत. (हेही वाचा, Samruddhi Mahamarg: महत्त्वाकांक्षी मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे 2 मेला होणारे लोकार्पण पुढे ढकलले, जाणून घ्या कारण )

समृद्धी महामार्गावर अशाच प्रकारचा एक अपघात दोन दिवसांपूर्वीच झाला. या अपघातात एका मजूराचा मत्यू तर दोघे जखमी झाले होते. ही घटना समृद्धी महामार्गावरील उन्नत वन्यजीव मार्गावरील कमानीचा काही भाग कोसळल्याने घडली होती. हा अपघात 24 एप्रिल रोजी नागपूरपासून 36 किलोमीटर अंतरावर पहाटे तीनच्या सुमारास घडला. वन्यजीवांना महामार्ग ओलांडता यावा यासाठी कमानीवर काँक्रिट टाकून एक पूल बांधला जा आहे. या पूलावरील कमानीचा आर्धा भाग काँक्रीटसह खाली आला. त्यामुळे हा अपघात घडला. एकूण मार्गावर अशा प्रकारच्या सुमारे 105 कमानी आहेत.