Sairat in Reality in Wardha: वर्धा (Wardha) येथील आर्वी शहरात शनिवारी रात्री सैराट (Sairat Movie) चित्रपटात दाखवल्याप्रमाणे एक घटना धक्कादायकरित्या वास्तवात घडली. येथील एका तरुणाने प्रेमसंबंधातून पळून गेलेल्या बहिणीच्या सासूची तिच्या राहत्या घरात हत्या केली. बेबी लक्ष्मण मेंढे असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. विशेष म्हणजे हा तरुण आपले वडील आणि एका नातेवाईकासोबत बेबी मेंढे यांच्या घरी आला होता. त्याने बेबी मेंढे यांच्याशी चांगला संवाद साधला. त्यांच्या घऱी चहा, नाश्ता घेतला आणि त्यानंतर तिची हत्या केली. या तरुणाने आपल्या पळून गेलेल्या बहिणीचा पत्ता सांगितला नसल्याने हत्या केल्याचे सांगितले जात आहे.
मृत बेबी लक्ष्मण मेंढे या मूळच्या अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील कवडगव्हाण गावच्या रहिवासी आहेत. चार महिन्यांपूर्वीच त्या आर्वी शहरानजीक असलेल्या पिंपरी येथे रहायला आल्या. त्या भाड्याच्या घरात राहात असत. बेबी मेंढे यांच्या मुलासोबत वर्धा येथील गणेश काळे यांच्या मुलीने प्रेमसंबंधातून पळून जाऊन विवाह केला. या घटनेसा सहा महिने उलटून केले आहेत. गेली सहा महिने या युगुलाचा कोणालाच थांगपत्ता नाही. मुलांच्या प्रेमप्रकरणावरुन काळे परिवारात बेबी मेंढे आणि त्यांच्या परिवाराविषयी राग होता. दरम्यान, शनिवारी सायंकाळी गणेश काळे आणि त्यांचा मुलगा उमेश काळे हे दोघे अन्य एका नातेवाईकासोबत बेबी मेंढे यांच्या घरी पाहुणे म्हणून आले.
दरम्यान, आलेल्या पाहुण्यांनी (गणेश काळे, उमेश काळे आणि एक नातेवाईक) बेबी मेंढे यांच्याकडे चहा, नाश्ता घेतला. तसेच, झाले गेले विसरुन जाऊया असेही बोलणे केले. त्यांच्यात हलकाफुलका संवाद सुरु होता. दरम्यान, उमेश काळे (पळून गेलेल्या मुलीचा भाऊ) याने अचानक पुन्हा जुना विषय काढला आणि ''माझी बहीण आणि तुमचा मुलगा कोठे आहे असे विचारले''. यावर बेबी यांनी त्या दोघांविषयी काहीच माहिती आपल्याला नसल्याचे उमेश याला सांगितले. बेबी यांच्या उत्तराने उमेश काळे याचे समाधान झाले नाही. त्याने सोबत आणलेल्या धारधार शस्त्राने बेबी मेंढे यांच्यावर सपासप वार केले. यात त्या गंभीर जखमी झाल्या. (हेही वाचा, प्रेमविवाह केला आहे? की करायचा आहे? जाणून घ्या फायदे तोटे)
दरम्यान, आजुबाजूचे शेजारी जमा झाले होते. त्यातील काही लोक बेबी मेंढे यांना उपचारासाठी अमरावती घेऊन निघाले. मात्र, अर्ध्या रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, शेजाऱ्यांनी गणेश काळे (आरोपी) याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर पोलिसांनी उमेश काळे आणखी एका नातेवाईकाला अटक केली.