शरद पवारांच्या नातवाची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर टीका
रोहित पवार ( फोटो सौजन्य- फेसबुक)

सामनाच्या 27 ऑक्टोंबरच्या अग्रलेखातून अजित पवारांवर जोरदार टीका करण्यात आली होती. तसेच अग्रलेखाचे मुख्य शीर्षक वाचून अजित पवारांच्या समर्थकांना राग येईल असे त्याचे शीर्षक होते. तर अजित पवारांना महाराष्ट्राच्या राजकरणात काडीमात्र किंमत नसल्याचे अग्रलेखात म्हटले आहे.

जालनामध्ये  24 ऑक्टोंबर रोजी अजित पवारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात राम मंदिर प्रकरणी हल्लाबोल केला होता. त्यामुळे अजित पवारांच्या या प्रश्नाचे सडेतोड उत्तर उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून दिले होते. मात्र या प्रकरणाचा पाठपुरावा करत रोहित पवार यांनी त्यांच्या फेसबुकवरुन आता चक्क उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. पवारांच्या नातवाने त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये, 'बाळासाहेब अखेरच्या क्षणी म्हणाले होते, आमच्या उद्धवला सांभाळा !' तसेच का सांभाळा याचा खरा अर्थ आता समजला असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

तसेच रोहित पवारांनी या पोस्टच्या शेवटी एवढा मोठा अग्रलेख लिहिण्यापेक्षा दोन ओळींचा राजीनामा दिला असता तर वडिलांप्रमाणे आपला ताठ कणा महाराष्ट्राला पाहावयास मिळाला असता अशी टीका फेसबुक पोस्टद्वारे केली आहे.