राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी असलेली सुरक्षा आजपासून हटवण्यात आली आहे. महाराष्ट्रासोबतच, देशभरातील राजकीय नेत्यांना यामुळे आश्चर्याचा मोठा धक्का बसला आहे. इतकंच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार व तरुण नेते रोहित पवार यांनी ही सुरक्षा काढण्यात आल्या नंतर भाजपवर निशाणा साधत हल्लाबोल केला आहे.
रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजपवर आरोप करत म्हटले आहे की, सुरक्षा काढण्याचा घेतलेला निर्णय हा सुडबुद्धीने घेतलेला आहे. भारतातील वरिष्ठ नेत्यांना व राजकीय व्यक्तींना सरकारने सुरक्षा पुरवणे किती आवश्यक आहे, याबद्दल देखील रोहित पवार यांनी आपले मत मांडले आहे.
रोहित पवार यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते व महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील भाजपवर कडाडून टीका केली.
ते म्हणाले की, केंद्र सरकारने जाणुनबुजून शरद पवारांची सुरक्षा कमी केली आहे. आणि म्हणूनच आव्हाड यांनी भाजपला सवाल केला की सुरक्षा काढली म्हणून शरद पवार घराबाहेर पडणार नाहीत का?
दरम्यान, शरद पवार हे महाराष्ट्र राज्याचे एक वरिष्ठ नेता असल्याने त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी सुरक्षा पररावण्यासाठी दिल्ली पोलिसांचे तीन आणि सीआरपीएफचे तीन जवान तैनात असायचे. मात्र 20 जानेवारीपासून ही त्यांना देण्यात आलेली ही सुरक्षा आता हटवण्यात आली आहे.