दुष्काळासंदर्भातील तक्रारी WhatsApp वर (संग्रहित संपादित प्रतिमा)

सध्या राजकारणी त्यांच्या भवितव्याबद्दल चिंता करण्यात व्यस्त आहेत, मात्र दुसरीकडे राज्यावर असलेल्या दुष्काळाच्या (Drought) संकटामुळे सामान्य जनता होरपळून निघाली आहे. बराच पाठपुरावा केल्यानंतर, विरोधी पक्षांनी हा मुद्दा उचलून धरल्यानंतर अखेर सरकारने यामध्ये लक्ष घातले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच दुष्काळी भागाचा दौरा केला, तर केंद्र सरकारने दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी 2160 कोटीची मदत जाहीर केली आहे. आता दुष्काळाबाबत कोणतीही तक्रार असल्यात ती तुम्ही WhatsApp वर नोंदवू शकणार आहात. यासाठी राज्य सरकारने एक नंबर जारी केला आहे.

दुष्काळामुळे पिण्याच्या पाण्यापासून, जनावरांच्या चाऱ्यापर्यंत अनेक समस्या उद्भवल्या आहेत. या सर्वांवर येत्या 48 तासांमध्ये उपाययोजना करावी, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील सरपंचांना दिले आहेत. मात्र तरी याबाबत कोणत्याही समस्या असतील तर त्या WhatsApp वर नोंदवण्याची सोय करण्यात आली आहे. यासाठी औरंगाबाद आणि जालना जिह्यासाठी 8879734045 हा WhatsApp क्रमांक जाहीर केला आहे.

या नंबरवर करण्यात आलेल्या तक्रारी थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचणार आहेत. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार यांना या तक्रारींवर कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (हेही वाचा: आटलेली विहीर अजून खोदली, आता तासाला एक घागर पाणी; 2 हंडा पाण्यासाठी महिला रात्रभर रांगेत)

दुष्काळावर सरकारकडून उपाययोजना –

> जनावरांना पाणी उपलब्ध व्हावे यासाठी, टँकरच्या पाण्यात वाढ

> बंद पडलेली नळ पाणीपुरवठा योजना तत्काळ सुरू, नळ दुरुस्तीची कामे सुरु

> जास्तीत जास्त जलसंधारणाची कामे हाती घेण्यावर भर

> 2018 च्या लोकसंख्येनुसार चार छावण्या, टँकर यांच्यात वाढ

या नंतरही या उपाययोजना व्यवस्थित राबवल्या जात नसतील असे वाटत असेल तर, वर नमूद केलेल्या नंबरवरून नागरिक थेट मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधू शकतात.