म्हैसमाळ गावात पाणीटंचाई (संग्रहित-संपादित प्रतिमा)

हवामान खात्याच्या अंदाजानुसार मान्सूनचे थोड्या उशिराने आगमन होणार आहे. त्याआधी उन्हाच्या झळांनी जमिनी तापून निघाल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये विदर्भ, मराठवाड्यामध्ये दुष्काळाचे सावट पसरले आहे. काही ठिकाणी सध्याची परिस्थिती ही मागच्या वर्षीपेक्षा भयानक आहे. राज्यातील 151 तालुके शासनाने दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केलेले आहेत. मात्र अजूनही दुष्काळावर मात करण्यासाठी सरकारने काही उपाययोजना केली नाही. यामध्ये होरपळले जात आहेत ते सामान्य नागरिक. एक हंडा पाण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील महिलांचा मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता, आता याच दुष्काळामुळे एक गाव प्रकाशझोतात आले आहे.

नाशिकपासून साधारण 100 किमी अंतरावर म्हैसमाळ (Mhaismal) नावाचे गाव आहे. या गावात पाण्याचा कोणताही स्त्रोत नाही, त्यामुळे पिण्याच्या पाण्याची नेहमीच भ्रांत. गावापासून 1 किमी अंतरावर एक विहीर आहे, मात्र दुष्काळामुळे या विहिरीचे पाणीही आटले आहे. त्यामुळे पाण्यासाठी ग्रामस्थांनी ही विहीर आणखी 6 फूट खोदली आहे. आता या विहिरीतील छोट्या झऱ्यातून पाणी बाहेर येते, मात्र एक हंडा भरण्यासाठी 1 तास लागतो. (हेही वाचा: ठाणे जिल्ह्यात ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाई; एका हंड्यासाठी महिलांमध्ये मारामारी (Video))

अशाप्रकारे एक घागर पाण्यासाठी इथले ग्रामस्थ रात्रीपासूनच रांग लावतात. या गावात साधारण 80 कुटुंबे राहतात, तर 1 दिवसात फक्त 12 कुटुंबेच 2 घागरी पाणी घेऊ शकतात. अशाप्रकारे इथे दिवस रात्र पाणी भरण्याचे काम चालते. सध्या महाराष्ट्रात पाण्याची इतकी गंभीर समस्या निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील 3,262 जलाशयांत सध्या 19% पाणी साठा आहे. मराठवाड्यात तर हा पाणीसाठा फक्त 5% आहे.