Amol Kolhe (Photo Credit: Instagram)

महाराष्ट्रात आलेले कोरोनाचे संकट पलटवून लावण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान या कोविड काळात रेमडेसिवीर हे औषध रुग्णांसाठी संजीवनी मानले जात आहे. मात्र याची मागणी मोठ्या प्रमाणावर असल्याने या औषधाचा पुरवठा अपुरा पडत आहे. असा वेळी काय करावे यासाठी राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) यांनी याबाबत महत्त्वाची माहिती सोशल मिडियाद्वारे शेअर केली आहे. रेमडेसिव्हीर (Remdesivir Injection) हे जीवनरक्षक औषध नाही. ते उपलब्ध नसल्यास कोव्हिड टास्क फोर्सने फेव्हीपॅरावीर हे पर्यायी औषध सुचवलं आहे, ते रुग्णाला द्यावं, अशी माहिती अमोल कोल्हे यांनी दिली आहे.

"रेमडेसिवीरच्या वापराबाबत कोव्हिड टास्क फोर्सने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा व्हिडिओ केल्यानंतर नागरिकांच्या प्रतिक्रिया आल्या. त्यात एक महत्त्वाची प्रतिक्रिया अशी होती की, डॉक्टरांनी हे इंजेक्शन तर लिहून दिलंय, पण ते आता मिळत नाही. राज्यात अनेक ठिकाणी तुटवडा निर्माण झाला आहे. या परिस्थितीत काय करावे?" याकडे अमोल कोल्हेंनी लक्ष वेधलं आहे.हेदेखील वाचा- महाराष्ट्रात येत्या 15 दिवसांत Coronavirus रुग्णांची संख्या दुप्पट होण्याची शक्यता; 30 एप्रिलपर्यंत उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या होईल 11.9 लाख- CM Uddhav Thackeray

"कोव्हिड टास्क फोर्सने हे वारंवार सांगितलं आहे की, रेमडेसिव्हीर हे जीवनरक्षक औषध नाही. शरीरातील विषाणूंचा भार (व्हायरल लोड) कमी करण्यासाठी ते दिलं जातं. परंतु त्यामुळे रुग्णाचा जीव वाचतो, असं नाही. त्याचा रुग्णालयातील काळ कमी होऊ शकतो. परंतु जर ते उपलब्ध झालं नाही, तर काहीच उपलब्ध नसेल, तर कोव्हिड टास्क फोर्सने पर्यायी औषध फेव्हीपॅरावीर (Favipiravir) सुचवलं आहे. ते रुग्णाला तोंडावाटे द्यावं. ते महाराष्ट्रात पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. शासन आणि प्रशासन रेमडेसिव्हीरचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे" अशी ग्वाही अमोल कोल्हेंनी दिली.

"सातत्याने वाढत्या रुग्णसंख्येमुळे रेमडेसिवीरचा पुरवठा सुरळीत करण्याला मर्यादा येत आहेत. हा पुरवठा सुरळीत होईपर्यंत कोव्हिड टास्क फोर्सने सुचवलेली औषधे रुग्णांना देता येतील. कोव्हिडचे निदान वेळेत होणे गरजेचे आहे. ऑक्सिजन हे या काळात महत्त्वाचे औषध आहे. तसंच रेमडेसिव्हीर रुग्णांना देताना डॉक्टरांनी पुरेशी काळजी घ्यावी. यासोबतच उपलब्ध साठा काळजीपूर्वक वापरुन गरज असणाऱ्या रुग्णांनाच हे इंजेक्शन दिले जावे. अवाजवी वापर टाळावा, अशी माझी नम्र विनंती आहे." असे ट्विटही अमोल कोल्हेंनी केले आहे.