Ajit Pawar | (File Photo)

मशिदींवरील लाऊडस्पीकरचा मुद्दा उपस्थित करणार्‍या राज ठाकरे यांच्यावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सडकून टीका केली. पवार म्हणाले, विविध मुद्द्यांवर मनसे अध्यक्षांनी केलेल्या आंदोलनांचा राज्यावर आणि समाजावर विपरित परिणाम झाला आहे. पवार यांनी दावा केला की, राज ठाकरे यांच्या यापैकी एकाही आंदोलनाला आतापर्यंत यश मिळाले नाही. मशिदींमध्ये लाऊडस्पीकरवर 'अजान'चा आवाज ऐकू आल्यास त्या ठिकाणी हनुमान चालिसा वाजवा, असे राज ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगितले आहे. या आवाहनावरून उद्भवलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार पुणे येथे पत्रकारांशी बोलत होते.

पवारांनी राज ठाकरेंचे नाव न घेता सांगितले की, ‘ज्या व्यक्तीने लाऊडस्पीकरचा मुद्दा उपस्थित केला त्यांनी एकदा महामार्गावरील टोल टॅक्सच्या विरोधात आंदोलनाची घोषणा केली होती आणि टोलवसुली बंद केली जाईल असे सांगितले होते. त्यासाठी पुणे-मुंबई महामार्गावर आंदोलन करण्यात आले, मात्र त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. हे आंदोलन अनेक दिवस चालले, पण पुढे त्याचे काहीही झाले नाही. या व्यक्तीने केलेल्या आंदोलनाचा राज्य आणि समाजावर विपरीत परिणाम झाला.’

अजित पवार पुढे म्हणाले की, ‘उद्या देशातील टोलनाके बंद केले तर काय होईल, फक्त कल्पना करा. आज केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे टोलवसुली होत आहे व त्यामुळे हे सर्व महामार्ग पूर्ण झाले,’ यावेळी पवार यांनी उत्तर प्रदेश आणि बिहारमधील स्थलांतरित कामगारांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेल्या आंदोलनाचीही आठवण करून दिली.

ते म्हणाले, ‘यूपी आणि बिहारमधील कामगारांविरुद्धच्या या आंदोलनानंतर, महाराष्ट्रातील बांधकाम कामे ठप्प झाली. त्यानंतर बांधकाम व्यावसायिकांनी आपल्याकडे बांधकामासाठी मजूर नाहीत अशा तक्रारी करायला सुरुवात केली. पुढे स्थलांतरित कामगारांना परत आणावे लागले,’ मनसेचे फेरीवाल्यांविरोधातील आंदोलनही फसल्याचे पवार म्हणाले. (हेही वाचा: राज ठाकरे यांच्यावर अंकुश ठेऊन त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; न्यायालयात याचिका दाखल)

ते म्हणाले. ‘लाऊडस्पीकरवरील या वादामुळे शिर्डीच्या साईबाबा मंदिरात लाऊडस्पीकरवरील 'काकड आरती' (पहाटेची प्रार्थना) थांबवण्यात आली, असाच एक प्रकार पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात घडला. सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत लाऊडस्पीकरच्या डेसिबल पातळीबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांची सर्वत्र अंमलबजावणी करणे आवश्यक आहे, ज्यामुळे सूर्यास्तानंतर होणाऱ्या मोठ्या सार्वजनिक सभा थांबतील.’ ते म्हणाले, ‘परंतु मला ग्रामीण भागांबद्दल काळजी वाटते जिथे 'हरिनाम सप्ताह', जागरण-गोंधळ यासारखे अनेक धार्मिक कार्यक्रम रात्री होतात, कारण जर नियम लावायचे असतील तर ते सर्वांसाठी समान असतील.’