Raj Thackeray | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना राज्यात पत्रकार परिषदा आणि दौरे आयोजित करण्यापासून रोखण्यासाठी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना लाऊड ​​स्पीकरवर हनुमान चालीसा वाजवण्यास थांबवण्याचे आदेश देण्याची मागणी करणारी जनहित याचिका (PIL) मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकामध्ये ठाकरे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.

सध्या राज्यात लाऊडस्पीकरचा मुद्दा चर्चेत आहे. राज ठाकरे यांनी मशिदींमधून लाऊडस्पीकर काढून टाकण्याची मागणी केली आहे. ठाकरे यांनी मुंबई, ठाणे आणि नुकतेच औरंगाबाद याठिकाणी सभा घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. औरंगाबाद येथील भाषणात 4 मेपर्यंत मशिदीवरील भोंगे काढा, अन्यथा परिणामांना सोमोरे जा, असे चिथावणीखोर वक्तव्य करीत मशिदींसमोर हनुमान चालीसा लावण्याचे आदेश मनसे कार्यकर्त्यांना दिले होते.

ठाकरे यांच्या अशा चिथावणीखोर वक्तव्यामुळे राज्यात धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचा राज ठाकरे यांचा हा प्रयत्न असून, त्यासाठी त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करत, त्यांना अटक करण्याचे आदेश द्यावेत, अशी प्रमुख मागणी याचिकेमध्ये करण्यात आली आहे.

अधिवक्ता आर.एन. कचवे यांच्यामार्फत दाखल करण्यात आलेल्या याचिकेत अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे की, ठाकरे यांच्या प्रक्षोभक विधानांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून राज्यात निदर्शने होऊ शकतात, ज्यामुळे समाजातील शांतता भंग होऊ शकते. जनहित याचिकेमध्ये नमूद करण्यात आले आहे की, औरंगाबाद पोलिसांनी राज यांच्याविरोधात कलम 153 (दंगल घडवण्याच्या उद्देशाने चिथावणीखोर भाषण देणे), कलम 116 (गुन्ह्यास उत्तेजन देणे) आणि 117 (10 हून अधिक लोकांनी केलेल्या गुन्ह्यास उत्तेजन देणे) या कलमांखाली भारतीय दंड संहिता अंतर्गत गुन्हांची नोंद केली आहे. (हेही वाचा: Ajit Pawar On Ultimatum: महाराष्ट्रात अल्टीमेटम, हुकुमशाही चालणार नाही; अजीत पवार यांचा स्पष्ट इशारा)

याचिकेमध्ये म्हटले आहे की, 3 मे पर्यंत अनेक मशिदींच्यावरील भोंगे न उतरल्याने ठाकरे यांनी हनुमान चालीसा वाजवण्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. यामुळे शांतता भंग झाली आणि परिणामी महाराष्ट्राच्या काही भागात दंगली झाल्या. असे  सर्व घडूनही ठाकरे यांच्यावर आयपीसी कलम 124 अ अंतर्गत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, असा युक्तिवाद पाटील यांनी केला आहे. पाटील यांनी याबाबत पोलीस आयुक्त आणि मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ निरीक्षकांना याबाबत निवेदन दिले, मात्र अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. ठाकरे यांच्यावर अंकुश ठेवण्यासोबतच पाटील यांनी मनसे प्रमुखांवर देशद्रोहाचा आणि शांतता भंग आणि सार्वजनिक उपद्रवाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.