Raj Thackeray | (Photo Credits: File Photo)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (Maharashtra Navnirman Sena) आज 15 वा वर्धापन दिन आहे. सध्या महाराष्ट्रात असलेल्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मनसेने त्यांचा वर्धापन दिन सोहळा रद्द केला आहे. पण आज सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंट वरून मनसे कार्यकर्त्यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहे. किल्ल्याला तोरण माळा, उगवता सूर्य आणि भरारी घेणारा पक्षी या सांकेतिक चिन्हांमधून मनसेने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा नवा उत्साह आणि काम करण्याची उर्मी भरण्यासाठी संदेश दिल्याचं म्हटलं जात आहे.

मनसे पक्षाकडे विधानसभेमध्ये अवघा 1 आमदार आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीमध्ये मनसेने मोठी भरारी घ्यावी यासाठी सध्या मनसेकडून प्रयत्न सुरू आहेत. वर्षभरापूर्वीच मनसे कडून पक्षाचा झेंडा बदलून हिंदुत्त्वाची कास धरत असल्याचं पहायला मिळालं. 2022 साली बीएमसी निवडणूकांसाठी मुंबई मध्ये मनसेचे एक नेता एक सरचिटणीस अशी टीम काम करत आहे.

राज ठाकरे यांचं ट्वीट

राज ठाकरेंचा ऑडिओ मेसेज

'मनसेच्या 15 वर्षाच्या प्रवासात अनेक मनसे सैनिकांच्या घरातल्यांनी देखील खूप सोसलंं आहे. त्यांनी त्याग केला आहे. खूप सोसलं, मी त्यांचे मनापासून आभार मानतो. तुमच्या कुटुंबियांना सांगू इच्छितो की, आपला प्रवास खडतर आहे. पण, गरुड भरारी घेण्याची शक्ती तुमच्या सदिच्छांमुळे आणि आशीर्वादामुळे आमच्या पंखात आली आहे. त्याच्या जोरावर आम्ही सगळी आव्हान सहज पेलून पुढे जाऊ. करोनाच्या सध्याच्या परिस्थितीमुळे हा पहिलाच वर्धापन दिन आहे, ज्यामुळे आपण भेटू शकत नाही. मला कल्पना आहे, तुम्ही मला भेटायला आतूर आहात. मी देखील आहे. पण सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता गर्दी टाळणं आवश्यक आहे. हे तुम्हीही मान्य कराल. तुम्हाला समोर पाहता येणार नाही, भेटता येणार नाही म्हणून हा रेकॉर्डेड संदेशाचा मार्ग स्वीकारला आहे'. असं म्हणत मनसे सदस्य नोंदणीमध्ये सहभागी होण्याचं देखील आवाहन केले आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी मनसेच्या बैठकीमध्ये राज ठाकरे या आठवड्यात अयोद्धा दौर्‍यावर जाणार असल्याचं देखील सांगण्यात आले होते मात्र सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे त्यांचा अयोद्धा दौरा देखील अद्याप जाहीर झालेला नाही.