Khalapur Irshalwadi Landslide: रायगड जिल्ह्यातील खालपूर तालुक्यात इर्शाळवाडी गाव जमीनदोस्त झालं. निसर्गरम्य वातावरणात डोंगराच्या कड्याकपारी वसलेलं आणि सुखाने नांदत असलेल्या या गावावर काळाचा घाला आला.दरड कोसळल्याने 45 घरांचं हे गावच गाढलं गेलं. मदत आणि बचाव कार्य अद्यापही सुरु आहे.मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील काही मंत्री तिथे तळ ठोकून आहेत. दरम्यान, काही राजकीय नेत्यांनीही या घटनेबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी तर थेट प्रश्न विचारत भूमिका मांडली आहे. दरडी कोसळण्याची स्थिती असलेले प्रदेश प्रशासनाला माहिती असायला हवेत. त्या ठिकाणचा अंदाज प्रशासनाला नसेल तर ते कसलं प्रशासन? असेही त्यांनी म्हटले आहे.
इर्शाळवाडी गावात माळीणप्रमाणेच घटना घडली. घरंच्या घरं मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. संकटातही थोडासा अवधी मिळलेली आणि काही शारीरिकदृष्ट्या सबळ असलेली बायकापोरं कोपलेल्या निसर्गाच्या वक्रदृष्टीतून वाचली. बाकीच्यांना उगवता दिवस पाहायला मिळाला नाही. रात्रीच्या अंधारातच त्यांची माती झाली. मदत आणि बचाव कार्य अद्यापही सुरु आहे. जवळचे नातेवाईक गेल्याने निरस झालेले जीव आठवणींनी व्याकूळ झाले आहेत. त्यांच्या दु:खाला पारावार राहिला नाही. घडलेल्या घटनेबद्दल राज ठाकरे यांनीही दु:ख व्यक्त केले आहे. (हेही वाचा, खालापूर इर्शाळवाडी दुर्घटना, 'मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची मदत, जखमींवर शासकीय खर्चाने उपचार')
राज ठाकरे यांनी काय म्हटले?
ट्विटरवरुन व्यक्त केलेल्या भावनांमध्ये राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, रायगड जिल्ह्यातील, खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे गावावर दरड कोसळल्याची घटना अतिशय दुःखद आहे. युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे असं सांगण्यात येत आहे. ह्यातून लोकं सुखरूप बाहेर पडावीत इतकी इच्छा. जे जखमी आहेत त्यांच्यावर योग्य उपचार सुरु आहेत ना आणि त्यांच्या नातेवाईकांना आपल्याकडून काय मदत मिळेल हे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जरूर पाहावं. खरंतर अशा घटना घडल्यावर लगेच हे बोलायची इच्छा नव्हती, पण आत्ता इतकंच सांगतो की कुठे दरड कोसळू शकतात ह्याचा अंदाज जर त्या जिल्हा प्रशासनाला येत नसेल तर मग ते कसलं प्रशासन? असो. पुढे ह्यावर सविस्तर बोलेन पण आत्तातरी सगळे सुखरूप राहावेत हीच इच्छा, असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.