Rain | Representational Image (Photo Credits: Pixabay)

राज्यात आज (20 नोव्हेंबर) आणि उद्या (21 नोव्हेंबर) काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस (Rain in Maharashtra) पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून उकाडा वाढला असून, तापमानातही सातत्याने बदल जाणवत आहे. प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण आदी प्रदेशांमध्ये हा बदल ठळकपणे जाणवत आहे. दरम्यान, नगर, नाशिक, पुणे जिल्ह्यातील काही भागात पावसाच्या हलक्या सरी देखील कोसळल्या आहेत. पावसाची हिच स्थिती पुढचे एकदोन दिवस (Rain Updates in Maharashtra) अशीच कायम राहण्याची शक्यता आहे.

प्राप्त माहितीनुसार, अरबी समुद्राच्या दक्षिण भागात गुरुवारी (19 नोव्हेंबर) काहीसा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याची स्थिती पाहायला मिळाली. अशी स्थिती ही पावसासाठी अनुकूल असते. त्यामुळे राज्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. दुसऱ्या बाजूला उत्तरेकडील राज्यांमध्ये वातवरमीय बदलामुळे थंडीचा कडाका आणखी वाढण्याची अधिक शक्यताही निर्माण झाली आहे. (हेही वाचा, Maharashtra Weather Forecast: पुण्यासह राज्यातील 'या' भागांमध्ये 2 दिवस अवकाळी पावसाची शक्यता)

दरम्यान, बंगालच्या उपसारातून बाष्पाचा पुरवठा होत असल्याने राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. राज्यातील तापमान वाढले असून, उकाडाही वाढला आहे. त्यामुळे राज्यात एका बाजूला थंडी, दुसऱ्या बाजूला उन तर मध्येच उकाडा अशी विचीत्र स्थितीही पाहायला मिळत आहे. दरम्यान, मोसमी वारेही सक्रीय झाले आहे. त्यामुळे दक्षिण भारतातील राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढल्याचे पाहायला मिळू शकते.

महाराष्ट्राबाबत बोलायचे तर राज्यात उद्यापर्यंत (शनिवार, 21 नोव्हेंबर) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, बीड, जालना, नांदेड, बुलडाणा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, वाशीम, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती आदी ठिकाणी आज हलका पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तर दुसऱ्या बाजूला बीड, अकोला, अमरावती, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या ठिकाणी उद्या (शनिवार, 21 नोव्हेंबर) मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो असे, हवामान विभागाने म्हटले आहे.