Unseasonal Rain | (Photo Credits: Pixabay)

नोव्हेंबर महिना सुरु होताच थंडीची चाहुल लागली. परंतु, गेल्या काही दिवसांपासून तापमानात अचानक वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. 19 आणि 20 नोव्हेंबर रोजी पुण्यासह (Pune) विदर्भ (Vidarbha), मराठवाडा (Marathawada) आणि राज्यातील काही ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊसाचा अंदाज असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. तसंच पुढील दोन दिवस शहर भागांत ढगाळ वातावरण अनुभवायला मिळणार आहे.

अवकाळी पावसामुळे शेतमालाचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकऱ्यांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. शेतमाल कोरड्या जागी नेऊन ठेवावा, दिवाळीतील विद्युत रोषणाईमुळे विजेचे खांब किंवा इतर लोखंडाला स्पर्श करताना सावधनता बाळगावी, अशा सूचना हवामान खात्याकडून करण्यात आल्या आहेत. (मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक भागांत थंडीची चाहुल, वातावरणात आला गारवा-IMD)

राज्याच्या सर्वच भागात रात्रीच्या किमान तापमानात घट झाल्याने थंडी जाणवत होती. मात्र अरबी समुद्रात दक्षिण-पश्चिम पूर्व भागामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने तापमानात वाढ होत आहे. परिणामी थंडी कमी होऊन नागरिकांना उष्ण वातावरण अनुभवायला मिळत आहे. दरम्यान, अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाल्याने अवकाळी पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, 18 नोव्हेंबर पासून मुंबईमधील तापमानातही वाढ होताना दिसत आहे. काही ठिकाणी कमाल तापमान 35 अंशाच्या वर गेले आहे. त्यामुळे मुंबईकरांना देखील काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. काल संध्याकाळी नाशिक, सातारा येथे हलका पाऊस झाला. तर कोकणातील काही भाग आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण पाहायला मिळाले.

यंदा राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढावले आहे. त्यात निसर्ग चक्रीवादळाची भर पडली असल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. त्यातून सावरत असताना आता अवकाळी पावसाचे संकट घोंगावत आहे.