Maharashtra Weather Forecast: मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक भागांत थंडीची चाहुल, वातावरणात आला गारवा-IMD
Cold | Photo Credits: PTI

महाराष्ट्रात (Maharashtra) आज सकाळपासून वातावरणात छान गारवा आला असून मुंबई, पुण्यासह अनेक भागात थंडीची चाहुल लागली आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या परतीच्या पावसाने संपूर्ण महाराष्ट्राला चांगलेच झोडपले असून शेतीसह अनेक नागरिकांचे अतोनात नुकसान केले आहे. मात्र या परतीच्या पावसाने ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस विश्रांती घेतली आहे आणि आता पाऊस महाराष्ट्रातून पूर्णपणे नाहीसा झाला असून राज्यातील त्याचा मुक्काम पूर्णपणे संपला आहे हे आजच्या वातावरणावरून दिसत आहे. आज मुंबईत (Mumbai) छान थंडी पडली असून सकाळपासूनच वातावरणात गारवा (Maharashtra Weather Forecast) आला आहे.

पुण्यातही आज सकाळपासून निरभ्र आकाश दिसत असून दरवर्षीप्रमाणे यंदाही छान पडणार आहे असंच एकूणच वातावरण तयार झाले आहे. हवेत आलेला गारवा पावसाने त्रस्त झालेल्या आणि उन्हाने हैराण झालेल्या लोकांना ही गुलाबी थंडी आल्हाददायक अनुभव देणारी आहे. हेदेखील वाचा- महाराष्ट्र: अतिवृष्टीमुळे संत्र्यांचे भाव कोसळले, बागायतदारांचे प्रचंड प्रमाणात नुकसान

दरम्यान, मागील महिन्यात राज्यातील काही भागांमध्ये हलका ते मध्यम, मुसळधार पाऊस सुरुही झाला आहे. काही ढिकाणी ढगफुटीच्या घटना घडल्या आहेत. काही ठिकाणी पिकांना फटका बसला आहे. हातातोंडाशी आलेल्या पिकावर मुसळधार पावसाने पाणी फेरले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.