रायगड जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ: पनवेल ते महड चे उमेदवार, महत्त्वाच्या लढती आणि निकाल घ्या जाणून
रायगड जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ (Photo Credits: File Image)

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Elections 2019) प्रचारसत्र, सभा, आश्वासने या सर्व मार्गाने प्रत्येक पक्ष आपली एक छाप जनमानसात निर्माण करू पाहत आहे. या सर्व प्रयत्नांना काय प्रतिक्रिया मिळते हे पाहण्यासाठी 21 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात मतदान घेतले जाईल , तसेच 24 ऑक्टोबर रोजी या मतदानाचे निकाल जाहीर होतील. तत्पूर्वी राज्यातील कोकण विभागातील महत्वाचा मानला जाणाऱ्या रायगड जिल्ह्याच्या अंतर्गत येणाऱ्या मतदारसंघांचा एक आढावा आपल्यासमोर सादर करीत आहोत. विधानसभेच्या एकूण 288 मतदारसंघांपैकी रायगड मध्ये आहेत कर्जत (Karjat), पनवेल (Panvel), श्रीवर्धन (Shreevardhan), महड (Mahad), अलिबाग (Alibaug), पेण (Pen), उरण (Uran) हे 7 मतदारसंघ आहेत. या जिल्ह्यातील यंदाच्या प्रमुख लढती आणि मागील निवडणुकांचे निकाल थोडक्यात जाणून घेऊयात..

पनवेल विधानसभा मतदारसंघ

2014 साली विधानसभा निवडणुकीत भाजपचे प्रशांत ठाकूर यांनी साधारण सव्वा लाख मते मिळवून आमदारकी पटकावली होती, म्ह्णूनच यंदा  पुन्हा एकदा ठाकूर यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. तर त्यांच्या विरुद्ध  वंचितचे मानवेंद्र वैदू व अपक्ष म्ह्णून हरेश केणी हे मतदार आहेत.

महड विधानसभा मतदारसंघ

शिवसेनेचे भरत गोगावले यांनी मागील निवडणुकीत महाड मतदारसंघातून विजय मिळवला होता. . यंदा युतीने ही जागा शिवसेनेसाठी देत या ठिकाणहून पुन्हा एकदा गोगावले यांना तिकीट दिले आहे तर त्यांना टक्कर देण्यासाठी मनसे तर्फे देवेंद्र गायकवाड आणि काँग्रेसतर्फे माणिक जगताप हे उमेदवार असणार आहेत.

श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ

लोकसभा खासदार सुनील तटकरे यांचा पुतण्या अवधूत तटकरे यांना मागील निवडणुकीत राष्ट्रवादी कडून लढत सर्वाधिक मते मिळवली , मात्र यंदा त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने आदिती तटकरे यांना तिकीट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, मनसे तर्फे याठिकाणी संजय गायकवाड आणि शिवसेनेतर्फे विनय घोसाळकर हे उमेदवार आहेत.

कर्जत विधानसभा मतदारसंघ

मागील निवडणुकीत  शेकाप, शिवसेना, भाजपा या तिन्ही पक्षांच्या उमेदवारांना मागे टाकत अवघ्या अडीच हजाराच्या मताधिक्याने राष्ट्रवादीच्या सुरेश लाड यांचा विजय झाला होता. यंदा सुद्धा विद्यमान आमदार सुरेश लाड यांच्याविरुद्ध शिवसेनेचे महेंद्र थोरवे अशी लढत पाहायला मिळणार आहे.

अलिबाग विधानसभा मतदारसंघ

विधानसभा 2009 व 2014 पासून याठिकाणी शेकापची सत्ता होती, 2014 मध्ये सुद्धा 16 हजारच्या मताधिक्याने सुभाष पाटील यांच्या गळ्यात विजयी माळ पडली होती. मात्र यंदा याठिकाणी शिवसेना व काँग्रेसमध्ये लढत पाहायला मिळणार आहे. शिवसेनेचे महेंद्र शेठ दळवी व काँग्रेसच्या श्रद्धा ठाकूर यांच्यासोबतच अपक्ष म्हणून राजेंद्र ठाकूर यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज केला आहे.

पेण विधानसभा मतदारसंघ

मागील दोन विधानसभा निवडणुकीत पेण मतदारसंघातून शेकापचे उमेदवार धैर्यशील पाटील यांचा दणदणीत विजय झाला होता. यंदा विद्यमान आमदार पाटील हे अपक्ष म्ह्णून उभे आहेत तर  त्यांच्या विरुद्ध भाजपच्या रवीशेठ पाटील व काँग्रेसच्या नंदा म्हात्रे या उमेदवारांना रिंगणात उतरवण्यात आले आहे.

उरण विधानसभा मतदारसंघ

मागील निवडणुकीत उरण येथून काँग्रेस, शेकाप, शिवसेना, भाजपा या अटीतटीत शिवसेनेच्या मनोहर भोईर यांनी बाजी मारली होती. यंदा देखील सेनेने मनोहर भोईर यांना तिकीट दिले असून त्यांच्या विरुद्ध काँग्रेसचे मनीष पाटील, मनसेचे अतुल भगत व अपक्ष म्ह्णून विवेक पाटील यांनी उमेदवारी दाखल केली आहे.

रायगड जिल्ह्यात उरण, पनवेल व महड येथे युतीच्या विजयाची अधिक शक्यता आहे तर श्रीवर्धन हा तटकरे कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जात असल्याने येथे इतर पक्षांना मेहनत घ्यावी लागू शकते.