
मुलगा म्हणजे वंशाचा दिवा असा एक गैरसमज पिढ्यानपिढ्या आपल्या समाजात रुढ आहे. पण, हाच वंशाचा दिवा जेव्हा वाममार्गाला लागतो तेव्हा काय घडू शकते याचे एक क्रूर उदाहरण पुढे आले आहे. छत्तीसगड राज्यातील रायगड (Raigarh) जिल्ह्यातील बोतल्दा (Botalda) कुधरीपारा गावात सीताराम उरांव नावाच्या एका महाभयानक व्यक्तीने आपल्या जन्मादात्या आईची हत्या करुन तिच्या कवटीतून मेंदू (Brain) बाहेर काढला आणि तो कढईत भाजला. इतक्या टोकाची क्रूरता या विक्षिप्त व्यक्तीने केवळ एवढ्यासाठीच केली की, त्याच्या आईने त्याला दारुसाठी पैसे देण्यास नकार दिला. आरोपी सिताराम उरांव विवाहीत आहे. आरोपीच्या कृत्यास विरोध करण्यासाठी त्याची पत्नी तिथे धाऊन आली पण, तोपर्यंत आरोपीने आईची हत्या केली होती. त्यानंतर काहीच क्षणांमध्ये तो तेथून पळाला. प्राप्त माहितीनुसार, मिळालेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
सीताराम उरांव (वय 32 वर्षे) आपली आई फूलाबाई उरांव (वय 50 वर्षे) यांच्यासोबत सपत्नीक राहात होता. सीताराम याला दारुचे प्रचंड व्यसन होते. तो सतत दारुच्या नशेतच राहात असे. तो आईकडे सातत्याने पैसे मागत असे. नकार देताच मारहाण करत असे. ही घटना घडली तेव्हाही असेच घडले. आरोपीने आईकडे पैसे मागितले. आईकडून त्याला नकार मिळाला. पैशासाठी नकार मिळाल्याचे पाऊन आरोपी इतका संतापला की त्याने चक्क आईची हत्या केली. आरोपीचे मन इतक्यावर थंड झाले नाही. तर, त्याने मृत आईच्या डोक्याची कवटी फोटून त्यातून तिचा मेंदू बाहेर काढला. कवटीतून बाहेर काढलेला मेंदू आरोपीने कढईत भाजला. (हेही वाचा, मीरा रोड येथे आईची हत्या करत मुलानेसुद्धा संपवले आयुष्य, लॅपटॉपवर मिळाली सुसाईड नोट)
दरम्यान, मृत फुलादेवी यांच्या सुनेने (आरोपीची पत्नी) या घटनेची माहिती पोलिसांत दिली. प्राप्त माहितीनुसार पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत आरोपी घटनास्थळावरुन पसार झाला होता. पोलीसांनी फुलादेवी उरांव यांचा मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला. आरोपी परिसरातच लपला होता. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले तेव्हा आरोपीचे कपडे रक्ताने माकले होते.