कोविड-19 निर्बंध शिथिलीकरणाच्या निर्णयातून पुण्याला (Pune) वगळले गेले असल्याने पुण्यातील नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. याच पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी निर्बंध शिथिलीकरणासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे. यावरुन पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Murlidhar Mohol) यांनी काही सवाल उपस्थित केले आहेत. तसंच महापालिकेत भाजपाची (BJP) सत्ता असल्याने राज्य सरकार दुजाभाव करत असल्याची पुणेकरांमध्ये भावना निर्माण होत असल्याचे भाजपने म्हटले आहे.
"पुण्यातील व्यापाऱ्यांना, कष्टकऱ्यांना आणि सामन्यांना निर्बंध शिथिलतेच्या बाबतीत न्याय हवा असून त्याच अनुषंगाने पुणे व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा आली. त्याचबरोबर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितल्यानुसार शिथिलतेसाठी प्रस्ताव देण्यावरही चर्चा करण्यात आली. परंतु, मुंबई आणि इतर जिल्ह्यात शिथिलता देताना त्यांनी प्रस्ताव दिले होते का?" असा सवाल पुणे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केला आहे.
तसंच पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात वारंवार मागणी करत आहोत. पालकमंत्री सकारात्मकता दाखवतात. मात्र मुख्यमंत्री वेगळेच आदेश जारी करतात, असेही ते म्हणाले. तरीही या संदर्भातील प्रस्ताव राज्य सरकारला पाठवणार असल्याचे आश्वासन त्यांनी व्यापारी प्रतिनिधींना दिले आहेत. यापूर्वी देखील मोहोळ यांनी निर्बंध शिथिलकरणाच्या मुद्दयावरुन तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
मुरलीधर मोहोळ ट्विट्स:
पुण्यातील व्यापाऱ्यांना, कष्टकऱ्यांना आणि सामन्यांना निर्बंध शिथिलतेच्या बाबतीत न्याय हवा आहे. याच अनुषंगाने आज पुणे व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा झाली. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शिथिलतेसाठी प्रस्ताव देण्यास सांगितले असून याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली. pic.twitter.com/alqIehb4Xj
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) August 5, 2021
पालकमंत्री सकारात्मकता दाखवतात, मात्र मुख्यमंत्री वेगळेच आदेश जारी करतात. तर आरोग्यमंत्र्यांची भूमिका वेगळीच असते. मात्र तरीही या संदर्भातील प्रस्ताव राज्य सरकारला पाठवणार आहोत, असा शब्द व्यापारी प्रतिनिधींना दिला.
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) August 5, 2021
तर पुण्यातील पॉझिटीव्हीटी रेट 4 टक्क्यांपेक्षाही कमी असून केवळ महापालिकेत भाजपची सत्ता असल्याने राज्य सरकार दुजाभाव करत असल्याची पुणेकरांमध्ये भावना असल्याचे भाजपने ट्विटद्वारे म्हटले आहे.
पुण्यामध्ये गेले महिनाभर पॉजिटिव्हीटी रेशो हा ४% पेक्षा ही खाली असताना देखील केवळ भाजपची सत्ता पुणे महापालिकेमध्ये असल्यामुळे राज्य सरकार दुजाभाव करत असल्याची भावना पुणेकरांमध्ये होत आहे.#MVAAgainstPunekars #PuneFightsCorona
— BJP Pune (@BJP4PuneCity) August 5, 2021
दरम्यान, पुण्यातील अनलॉक नियमावलीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि मुख्य सचिव सिताराम कुंटे यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर निर्बंधांमध्ये सूट मिळावी यासाठी पुणे पालिकेने राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवावा. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे टोपे यांनी सांगितले होते.