
कोरोना व्हायरसची दुसरी लाट (Coronavirus Second Wave) ओसरत असल्याने राज्यातील लॉकडाऊनच्या (Lockdwon) नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. राज्यातील 25 जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. दुकानांच्या वेळमर्यादाही वाढवण्यात आली आहे. मात्र पुणे (Pune) जिल्ह्यातील निर्बंध अद्याप शिथिल केलेले नाहीत. यावरुन पुणेकर, व्यापारी नाराज आहेत. तर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ही नाराजी उघडपणे व्यक्त केली होती. दरम्यान, पुण्यातील अनलॉक नियमावलीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) आणि मुख्य सचिव सिताराम कुंटे यांच्यात चर्चा झाली. (पुणे: दुकानांच्या वेळेच्या निर्बंधावरुन व्यापारी महासंघ आक्रमक; 3 ऑगस्ट रोजी करणार घंटानाद आंदोलन)
काल रात्री झालेल्या या बैठकीत पुणे महापालिकेला सध्याच्या कडक नियमावलीत सूट देण्याबाबत चर्चा झाल्याचे टोपे यांनी सांगितले. निर्बंधांमध्ये सूट मिळावी यासाठी पुणे पालिकेने राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवावा. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे टोपे यांनी सांगितले. हा निर्णय मुख्यमंत्री घेतील, असेही ते म्हणाले. त्यामुळे आता पुण्यातील निर्बंध शिथिल होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नव्या अनलॉक नियमावलीनुसार, राज्यातील 25 जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. तर रुग्णसंख्या कायम असणाऱ्या 11 जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम आहेत. निर्बंध शिथिल केलेल्या जिल्ह्यांमध्ये दुकानांच्या वेळा वाढवण्यात आल्या आहेत. मात्र पुण्यातील रुग्णसंख्या कमी होत असूनही निर्बंध कायम आहेत, असे व्यापाऱ्यांसह नागरिकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, काल पुण्यात 249 नव्या रुग्णांची भर पडली असून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 250 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.