Doctors | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

पुण्यात एका बोगस हॉस्पिटलचा पर्दाफाश झाला आहे. मेहबूब फारुख शेख (Mehboob Farukh Shaikh) असे हे हॉस्पिटल चालवणाऱ्या डॉक्टरचे नाव आहे. मेहबूब शेख हा पुणे (Pune ) जिल्ह्यातील शिरुर (Shirur) येथे तब्बल 22 बेडचं हॉस्पिटल चालवतो. मोरया मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल (‘Morya Multispecialty Hospital) नावाने गेली दोन वर्षे तो हॉस्पिटल चालवत होता.आता तर त्याने चक्क कोरोना रुग्णांसाठी स्पेशल वॉर्ड बनवून उपचार सुरु केले होते. मेहबूब शेख हा 12 नापास आहे. त्यामुळे त्याच्याकडे कोणतीही वैद्यकीय डीग्री असण्याचा प्रश्नच नाही. असे असतानाही त्याने मोरया नावाचे हॉस्पिटल सुरु केले आणि गेली दोन वर्षे तो चालवतही होती. परंतू, हॉस्पिटलमध्ये असलेल्या पार्टनरसोबत त्याचा आर्थिक कारणावरुन वाद झाला आणि या संपूर्ण प्रकरणाचा भांडाफोड झाला.

धक्कादायक असे की आरोपी मेहबूब शेख हा नांदेडमधील एका डॉक्टरांकडे कंपाऊंडर म्हणून काम करतो. डॉक्टरांच्या हाताखाली काम करुन त्याला विवध आजारांवरील उपचारांची माहिती झाली. त्यातून बारावी नापास असलेल्या मेहबूब शेख याचा आत्मविश्वास इतका वाढला की त्याने चक्क पुण्यातील शिरुर येथे 'मोरया' नावाने हॉस्पिटल सुरु केले. विशेष म्हणजे हे हॉस्पिटलही सुरु झाले. त्याच्याकडे पेशंटही येऊ लागले. कोरोना काळात तर स्पेशल कोरोना वॉर्ड सुरु केला. दरम्यान, या सर्व प्रकारात साथ देणाऱ्या पार्टनरसोबत त्याचा आर्थिक कारणावरुन खटका उडाला आणि हे प्रकरण बाहेर आले. पोलिसांनी कारवाई करुन त्याला ताब्यात घेतले आहे. (हेही वाचा, Doctors On Strike In Maharashtra: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांकडून विविध मागण्यांसाठी आज चोवीस तास काम बंद आंदोलन)

दरम्यान, मेहबूब शेख यांच्या मोरया हॉस्पिटलमध्ये उपचार घेतलेल्या रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची घोर फसवणूक झाली आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच रुग्णांच्या नातेवाईकांनी त्याला पोलिसांसमोरच चोप दिला. मेहबूब सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याला हे हॉस्पिटल सुरु करण्यास कोणी मदत केली याचा पोलिस तपास करत आहेत. मेहबूब शेख हा डॉ. महेश पाटील नावाने रुग्णांवर उपचार करत असे. मेहबूबचा डॉ. महेश होण्यास कोणी मदत केली याचा तपास पोलीस करत आहेत.