
पुण्यातून (Pune) एक धक्कादायक घटना समोर येत आहे. एका 16 वर्षीय मुलाने व्यसनाधीन पित्याची डोक्यात लोखंडी रॉड (Iron Rod) घालून हत्या केली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, वडील दारु पिऊन मुलाला शिवीगाळ, मारहाण करत असतं. आपल्या वडीलांच्या या वागण्याला कंटाळलेल्या मुलाने रागाच्या भरात टोकाचे पाऊल उचलले आणि त्यात वडीलांचा मृत्यू झाला. (Sangli Murder: सांगलीत थरकाप उडवणारा प्रकार, मित्राची हत्या करून मृतदेहाचे तुकडे कूपनलिकेत टाकले; दोघांना अटक)
या घटनेनंतर आरोपी मुलाच्या मोठ्या भावाने तक्रार दाखल केली. त्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली. आरोपी मुलाला ताब्यात घेण्यात आले असून त्याची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती 43 वर्षांचा असून तो दुग्ध व्यावसायिक होता. (बायकोची हत्या करुन प्रेयसीचा खून; दुहेरी हत्याकांडाने सातारा हादरलं)
मृत व्यक्तीने आपल्या मोठ्या मुलाला 9 ऑगस्ट रोजी घरातून बाहेर काढले होते. परंतु, काही दिवसाने लहान मुलाने आपल्या भावाला पुन्हा घरात घेतले. लहान मुलाच्या या कृत्यामुळे वडील चिडले. त्यानंतर त्यांनी त्याला उपाशी ठेवण्यास आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. वडीलांच्या या जाचाला कंटाळून मुलाने वडीलांना लोखंडी रॉडने मारण्यास सुरुवात केली आणि यातच त्याच्या वडीलांचा मृत्यू झाला.
दरम्यान, यापूर्वी रागाच्या भरात आपल्या जवळच्या व्यक्तींची हत्या केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी नवी मुंबईमध्ये एका 15 वर्षीय मुलीने आपल्या आईची गळा आवळून हत्या केल्याची घटना समोर आली होती. आई अभ्यासाचा तगादा लावते म्हणून या अल्पवयीन मुलीने आईला संपवले.