Sangli Murder: सांगलीत थरकाप उडवणारा प्रकार, मित्राची हत्या करून मृतदेहाचे तुकडे कूपनलिकेत टाकले; दोघांना अटक
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

दारू पित असताना झालेल्या वादातून एका तरूणाने त्याच्यात मित्राची हत्या (Murder) केली आहे. तसेच मृतदेहाचे तुकडे करून कूपनलिकेत टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना सांगली जिल्ह्याच्या (Sangli) मिरज तालुक्यातील (Miraj) भोसे येथे 27 जुलै रोजी घडली आहे. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी (Miraj Rural Police Station) दोघांना अटक केली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस अधिक तपास करित आहेत.

दत्तात्रय झांबरे (वय, 30) असे हत्या झालेल्या तरूणाचे नाव आहे. दत्तात्रय हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा होता. दरम्यान, दत्तात्रय 27 जुलैला त्याचे मित्र अमोल खामकर आणि सागर सावंत हे तिघेजण मिरज-पंढरपूरोडवरील भोसे गावाजवळील बंद पडलेल्या पारस पावडर कंपनीच्या शेडमध्ये दारू पित बसले होते. दरम्यान, दत्तात्रयने अमोलला सिगारेट आणायला पाठवले. परंतु, सिगारेट आणायला उशीर झाला म्हणून दत्तात्रय कोयता घेऊन अमोलच्या अंगावर गेला. त्यावेळी सागरने दत्तात्रयच्या हातातील कोयता हिसकावून घेतला आणि त्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर अमोल आणि सागर या दोघांनी मिळून दत्तात्रयच्या डोक्यात दगड घातला. तसेच कोयत्याने सपासप वार करून त्याची हत्या केली. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून एका पोत्यात भरून कूपनलिकेत टाकला. हे देखील वाचा-Covid-19 Update in Maharashtra: राज्यात आज 6,686 नवे कोरोना रुग्ण; 158 मृत्यू

याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी अमोल आणि सागर या दोन्ही आरोपीला बेड्या ठोकल्या. दत्तात्रय झांबरे हा सतत त्रास देऊन दमदाटी करायचा, यामुळे त्याचा काटा काढल्याची कबूली आरोपींनी दिली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.