गोध्रा ट्रेन हत्याकांड प्रकरणी (Godhra Train Carnage Case) जन्मठेपेची शिक्षा झालेल्या एका फरार आरोपीला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात चोरीच्या (Theft) एका गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. सलीम जर्दा असे आरोपीचे नाव असून, त्याला 2002 च्या गोध्रा ट्रेन हत्याकांड प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली होती. तो त्या प्रकरणातील 31 दोषींपैकी एक होता. आता पुणे ग्रामीण पोलिसांनी 22 जानेवारी रोजी अटक केली. याबाबत आळेफाटा पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिनेश तायडे यांनी सांगितले की, त्यांनी सलीम जर्दा आणि त्याच्या टोळीतील सदस्यांना 22 जानेवारी रोजी एका चोरीच्या प्रकरणात अटक केली. ते पुण्याच्या ग्रामीण भागात चोरीच्या घटना करत होते.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोषी सलीम जर्दा 17 सप्टेंबर 2024 रोजी गुजरात तुरुंगातून 7 दिवसांच्या पॅरोलवर बाहेर आला होता आणि त्यानंतर तो फरार झाला होता. फरार झाल्यानंतर सलीम जर्दा चोरी करू लागला. पोलिसांनी सांगितले की, तपासात असे तीन चोरीचे गुन्हे उघडकीस आले ज्यात जर्दाचा सहभाग होता. तो त्याच्या टोळीसह गुजरातमधील गोध्रा येथून पुणे जिल्ह्यात यायचा आणि चोरी करायचा. जर्दा आणि त्याच्या टोळीतील सदस्यांना गेल्या महिन्यात पुण्यात 7 जानेवारी रोजी थांबलेल्या ट्रकमधून 2.49 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे 40 टायर चोरल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. पुण्यातील मंचर आणि नाशिकमधील सिन्नर परिसरातही अशाच प्रकारच्या चोरीशी त्यांचा संबंध होता.
सलीम जर्दासोबत अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये साहिल पठाण, सुफियान चाणकी, अयुब सुंथिया आणि इरफान दुरुवेश यांचा समावेश आहे. हे सर्व गोध्रा येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपींकडून एक टेम्पो ट्रक आणि चोरीचा माल जप्त केला आहे. त्याची एकूण किंमत 14.4 लाख रुपये होती. सिन्नर येथील चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपीला नाशिकच्या सिन्नर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. (हेही वाचा: Pune Gay Man Looted: समलिंगी तरुणांना निर्जन स्थळी लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, पुणे येथून म्होरक्यासह तिघांना अटक)
दरम्यान, 27 फेब्रुवारी 2002 रोजी गुजरातमधील गोध्रा येथे साबरमती एक्सप्रेसच्या एस-6 डब्यात जाळपोळ केल्याप्रकरणी सलीम जर्दा आणि इतर लोकांना दोषी ठरवण्यात आले होते. या घटनेत 59 जणांना आपला जीव गमवावा लागला. या प्रकरणात 31 जणांना दोषी ठरवण्यात आले होते. त्यापैकी 11 जणांना सुरुवातीला फाशीची शिक्षा झाली होती, तर 20 जणांना जन्मठेपेची शिक्षा झाली होती. फाशीची शिक्षा झालेल्या 11 जणांमध्ये जर्दाचा समावेश होता, परंतु (गुजरात) उच्च न्यायालयाने नंतर त्यांची शिक्षा जन्मठेपेत बदलली.