
पुणे (Pune) आणि पिंपरी-चिंचवडच्या वाहतुकीत 1 एप्रिलपासून मोठा बदल झाला. शहरात उबर ऑटो-रिक्षाने मीटरनुसार भाडे आकारण्यास सुरुवात केली. त्याआधी 18 फेब्रुवारी 2025 रोजी ऑटो चालकांसोबत नवीन करारावर स्वाक्षरी केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले. आता पुन्हा एकदा पुणे, पिंपरी-चिंचवड आणि बारामती येथील प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. अहवालानुसार, 1 मे 2025 पासून, ओला, उबर आणि रॅपिडो सारख्या ॲप-आधारित कॅब सेवादेखील सरकारने मंजूर केलेल्या मीटर दरपद्धतीनुसार शुल्क आकारणार आहेत. इंडियन गिग वर्कर्स फ्रंटच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी टीओआयला याबाबत माहिती दिली.
शुक्रवारी झालेल्या कॅब चालकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पुणे, पिंपरी चिंचवड आणि बारामती येथील ओला, उबर आणि रॅपिडो प्लॅटफॉर्म अंतर्गत चालणाऱ्या सुमारे 45,000 कॅबना हा नियम लागू होईल. सरकारने मंजूर केलेले कॅब भाडे पहिल्या 1.5 किमीसाठी 37 रुपये आणि त्यानंतर प्रति किमी 25 रुपये आहे. अशाप्रकारे पुण्यात 10 किमीच्या प्रवासासाठी अंदाजे 249.50 रुपये खर्च येईल. पुण्यात सध्या अनेक रिक्षा राईड बुकिंग प्लॅटफॉर्म भाडे प्रणालींमध्ये मीटरनुसार पैसे आकारत आहेत.
हे दर सध्याच्या ॲप-आधारित किंमतींपेक्षा जास्त आहेत. उदाहरणार्थ, सध्या 10 किलोमीटरच्या प्रवासासाठी सरासरी दर (सर्ज प्राइसिंगशिवाय) 175 ते 219 रुपये आहे. नव्या नियमांमुळे प्रवाशांना जास्त पैसे मोजावे लागतील, परंतु यामुळे दरात एकसमानता येईल आणि मनमानी शुल्क आकारणी थांबेल, असे सांगण्यात येत आहे. या बदलाला पाठिंबा देण्यासाठी, IGWF ने www.onlymeter.in नावाची वेबसाइट सुरू केली आहे. प्रत्येक कॅबमध्ये एक QR कोड असेल, जो प्रवाशांना या वेबसाइटवर घेऊन जाईल. प्रवासानंतर, प्रवासी प्रवास केलेले अंतर वेबसाइटवर टाकून सरकारने मंजूर केलेला दर तपासू शकतील. (हेही वाचा: Toll Waiver for EVs: मुंबई-पुणे एक्सप्रेसवे आणि समृद्धी महामार्गावर इलेक्ट्रिक वाहनांसाठी टोलमाफी? राज्य सरकार विचाराधीन)
पुण्यातील कॅब सेवांमध्ये गेल्या काही वर्षांपासून प्रवाशी आणि चालक यांच्यात दराबाबत तक्रारी वाढत होत्या. प्रवाशांनी ॲपवर दिसणाऱ्या दरापेक्षा जास्त शुल्क आकारणी आणि सर्ज प्राइसिंगच्या समस्यांवर नाराजी व्यक्त केली होती. दुसरीकडे, चालकांनी कमी कमिशन आणि कमी उत्पन्नामुळे तक्रारी केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर, सरकारने ऑटोरिक्शांसाठी आधीच मीटर दर लागू केला होता, आणि आता कॅब्ससाठीही हाच नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच ओला, उबर किंवा रॅपिडो ॲपवर दिसणारे दर हा फक्त अंदाज आहे, प्रवाशांना मीटरनुसार भाडे द्यावे लागेल.